नवी मुंबई : पनवेलमधील कामोठे परिसरात चक्क ‘राफेल’ची विक्री होत आहे. धक्का बसला ना? पण हे खरं आहे. तुम्ही 1000 रुपयात स्वतःच्या हक्काचं ‘राफेल’ विमानाचे मालक होऊ शकता. पण तरीही 1000 रुपयांत ‘राफेल’ कसं मिळेल, यावर आश्चर्य करण्याचे काही कारण नाही. आकाशात घिरट्या घालणारं हे खरेखुरे राफेल नसूनन पतंग आहे. कामोठेमधील एका विक्रेत्याने मकरंसंक्रातीच्या मुहूर्तावर ग्राहकांना आकर्षित करण्यासाठी राफेल विमानाच्या आकारातील पतंगाची निर्मिती करून ते विक्रीला ठेवले आहे. कामोठे वसाहतीमधील सेक्टर 9 परिसरात स्तुतीशा गृह उद्योग नावाने चालवण्यात येत असलेल्या दुकानात हे पतंग विक्रीकारिता उपलब्ध आहे. शालेय जीवनापासून केवळ हौशी खातर विविध आकारातील पतंग बनवणारे श्रीकांत रेपाळे यांनी यंदा प्रथमच विक्रीसाठी पतंगाची निर्मिती केली आहे. रेपाळे यांनी विमानाच्या आकारातील पतंगासोबत स्माईली, गोल्डन कोटेड पतंग, सिल्वर कोटेड पतंग आशा नावाने सध्या पतंग तयार केले आहे. त्यांनी 1 फुटापासून ते 10 फुटपर्यंत आकार असलेल्या या पतंगांची विक्री 50 रुपयांपासून 1000 हजार रुपयांपर्यंत करण्यात येत असल्याची माहिती रेपाळे यांनी दिली. श्रीकांत रेपाळे यांच्या पत्नी मागील काही वर्षांपासून कामोठे वसाहती मधील सेक्टर 9 परिसरातील भूखंड क्रमांक 17 वर असलेल्या गुरुकृपा अपार्टमेंट येथे गृह उद्योग प्रकल्पच्या माध्यमातून कोकणी पद्धतीच्या पिठाच्या विक्रीचा व्यवसाय करतात. यंदा प्रथमच त्यांनी विविध आकारतील पतंग तयार करून विक्रीला ठेवले आहेत.