महापालिका निवडणुकीसाठी मनसेची मोर्चेबांधणी, मंगळवारी राज्यस्तरीय बैठक

 

मुंबई: आगामी महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर महाराष्ट्र नवनिर्माण सेनेनं जोरदार मोर्चेबांधणी सुरु केली आहे. मंगळवारी मनसेची महत्वाची राज्यस्तरीय बैठक होणार आहे. सकाळी 11 वाजता वांद्रेतील MIG क्लब इथं ही बैठक होणार आहे. यावेळी पक्षातील पदाधिकाऱ्यांना आपल्याकडील अहवालाच्या स्वरुपात पक्षाला सादर करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. स्थानिक स्तरावरील निवडणुका आणि पक्षाची तयारी, पक्ष संघटन आणि बांधणी, स्थानिक स्तरावर राजकीय आणि सामाजिक स्थिती, लोकांचा कल, पक्षात रिक्त असलेल्या पदांच्या नियुक्त्या याबाबत पदाधिकाऱ्यांनी लेखी अहवाल पक्षाला देण्याची सूचना देण्यात आली आहे. 

मंनसे अध्यक्ष राज ठाकरे सक्रिय

पक्ष संघटना मजबूत करण्यासाठी मनसे अध्यक्ष राज ठाकरे पुन्हा एकदा सक्रिय झाल्याचं पाहायला मिळत आहे. गेल्या काही दिवसांत कृष्णकुंजवर बैठकांचं सत्र सुरु आहे. या बैठकांमध्ये राज ठाकरे विविध जिल्ह्यातील आपल्या पदाधिकाऱ्यांकडून स्थानिक पातळीवरील माहिती जाणून घेत आहेत. सोबतच कार्यकर्ते आणि पदाधिकाऱ्यांना काही सूचना देत आहेत. त्यामुळे आगामी महापालिका निवडणुकीत मनसे पुन्हा एकदा जोमाने उतरेल अशी चर्चा आता राजकीय वर्तुळात सुरु झाली आहे.

नाशिक महापालिकेत कमबॅक करण्यासाठी मनसे सज्ज

आगामी महापालिका निवडणुकीच्या निमित्तानं मनसेकडून कम बॅक करण्यासाठी जोरदार तयारी सुरु करण्यात आली आहे. मनसेच्या जुन्या आणि निष्ठावान पदाधिकाऱ्यांनी 7 डिसेंबरला ‘कृष्णकुंज’वर जात राज ठाकरे यांची भेट घेतली. या भेटीवेळी राज ठाकरे यांनी नाशिक मनसेत मोठे फेरबदल करण्याचे संकेत दिले आहेत. त्याचबरोबर राज ठाकरे यांनी नवीन वर्षात नाशिक दौरा करणार असल्याचे सांगितल्यानं मनसे कार्यकर्त्यांमध्ये नवीन उत्साह संचारला आहे.