पाच नगरसेवकांची बंडखोरी, भाजपला धक्का; गणेश नाईक म्हणतात…

 

नवी मुंबई: ऐन पालिका निवडणुकीच्या तोंडावर नवी मुंबई भाजपमध्ये बंडखोरी सुरू झाली आहे. नवी मुंबईतील आतापर्यंत पाच नगरसेवकांनी भाजपला सोडचिठ्ठी दिली आहे. हा भाजप नेते गणेश नाईक यांच्या वर्चस्वाला धक्का असल्याचं मानलं जात असून त्यामुळे नाईक गोटात खळबळ उडाली आहे. नगरसेवकांच्या बंडखोरीमुळे भाजपमध्ये अस्वस्थता असली तरी नाईक यांनी मात्र, जे गेले त्यांना शुभेच्छा, असं म्हणत या बंडखोरांना शुभेच्छा दिल्या आहेत. भाजपमधील बंडखोरीनंतर आज पहिल्यांदाच गणेश नाईक यांनी पत्रकार परिषद घेऊन त्यावर मौन सोडलं. जे पक्ष सोडून गेले त्यांना माझ्या हार्दिक शुभेच्छा. नव्या पक्षात दाखल झालेल्यांनी तिथे सुखाने नांदावे. नांदा सौख्य भरे, असं सांगतानाच मला नगरसेवकांनी सोडून जाणं हे नवीन नाही. ही आजची घटना नाही किंवा पहिल्यांदाच असं घडतंय असं नाही. 1995 पासून ही धरसोड सुरूच आहे, असंही त्यांनी सांगितलं.

भाजपचा महापौर होईल

गेल्या 25 वर्षांपासून गणेश नाईकांच्या आवाहनाला जनतेने साथ दिली आहे. त्यामुळे पुन्हा एकदा आमच्यावर जनता विश्वास टाकेल. भाजपचा महापौर निवडून देतील, याचा मला विश्वास आहे, असं नाईक म्हणाले. नवी मुंबई महापालिका तोंडावर आलेली असताना नाईकांना धक्का देत 5 नगरसेवक भाजपमधून बाहेर पडले आहेत. नाईक समर्थक असलेल्या या पाच नगरसेवकांपैकी तिघांनी शिवसेनेत तर दोघांनी राष्ट्रवादीत प्रवेश केला आहे. त्यामुळे हा नाईकांसाठी मोठा धक्का मानला जात आहे. त्यातून नाईक कसे कम बॅक करतात हे पाहणं औत्सुक्याचं ठरणार आहे.

दरम्यान, नाईक यांनी आज महापालिका आयुक्तांची भेट घेऊन शहरातील कामकाजाचा आढावा घेतला. यावेळी नगरसेवकांनी नवी मुंबईतील विविध तक्रारींचा पाढा वाचला. यावेळी माजी आमदार संदीप नाईक, माजी खासदार संजीव नाईक, माजी महापौर सागर नाईक, जयवंत सुतार, शंकर मोरे, सायली शिंदे, दशरथ भगत आणि इतर नगरसेवक उपस्थित होते.