नाणारच्या जमिनी शेतकऱ्यांना परत देणार, जमीन खरेदी-विक्रीचे सर्व व्यवहार रद्द करणार; राऊतांचा गौप्यस्फोट

सिंधुदुर्ग: नाणार प्रकल्प करण्यासाठी शिवसेनेने हालचाली सुरु केल्याच्या चर्चा सुरू असतानाच शिवसेनेचे खासदार विनायक राऊत यांनी मोठा गौप्यस्फोट केला आहे. नाणारमधील शेतकऱ्यांनी विकलेल्या जमिनी त्यांना परत देण्यात येणार आहे. नाणार प्रकल्पासाठी जमिनी खरेदी-विक्रीचे करण्यात आलेले सर्व व्यवहार रद्द करण्यात येणार असल्याचा दावा विनायक राऊत यांनी केला आहे. त्यामुळे नाणारवासियांना मोठा दिलासा मिळाला असून नाणार प्रकल्प होणार नसल्याचे स्पष्ट संकेत मिळत आहेत.

खासदार विनायक राऊत देवगडमध्ये आले होते. एका कार्यक्रमात बोलताना त्यांनी हा गौप्यस्फोट केला. नाणार रिफायनरी प्रकल्प कुठल्या परिस्थितीत होणार नाही, असं राऊत यांनी स्पष्ट केलं. नाणार प्रकल्पासाठी शेतकऱ्यांनी 7 लाख रुपये एकराने त्यांच्या जमिनी विकल्या. हा प्रकल्प झाला तर त्याचे मूल्य 90 लाख एकरी होणार आहे. दलालांनी जमिनी लाटून शेतकऱ्यांची लुबाडणूक केली आहे. 224 गुजराती आणि मारवाडी लोकांनी या जमिनी विकत घेतल्या आहेत. त्यामुळे हे सर्व व्यवहार रद्द करण्यात येईल, असं त्यांनी सांगितलं. यावेळी त्यांनी नाणार प्रकल्पाचे समर्थक भाजपचे माजी आमदार प्रमोद जठार यांच्यावरही टीका केली.

नाणार प्रकल्प घोषित केल्यानंतर नाणारमध्ये 2200 एकर जमीन खरेदी करण्यात आली. तर अध्यादेश निघाल्यानंतर 800 एकर जमिनीची खरेदी झाली होती. हे व्यवहार संशयास्पद असल्याने त्याची चौकशी करण्यासाठी सरकारने आधीच चौकशी समिती बसवली आहे. त्यामुळे नाणारमधील जमीन खरेदीचे सर्व व्यवहार रद्द होण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. 

दरम्यान, शिवसेनेचे आमदार राजन साळवी यांनी नाणार प्रकल्पाचं समर्थन केलं होतं. 90 टक्के स्थानिकांनी मोबदला स्वीकारल्याने जैतापूर प्रकल्पाचा मार्ग मोकळा झाला आहे. त्याच धर्तीवर नाणार प्रकल्पात स्थानिकांचा विरोध मावळला तर महाविकास आघाडी पुढचा निर्णय घेईल, असं राजन साळवी यांनी म्हटलं होतं. त्यानंतर त्यांच्यावर पक्षातूनच टीका झाल्याने त्यांनी सारवासारव करत हे आपलं वैयक्तिक मत असल्याचं म्हटलं आहे. नाणारबाबत मी मांडलेली भूमिका ही माझी वैयक्तिक भूमिका आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, शिवसेना आणि महाविकास आघाडीशी त्याचा कोणताही संबंध नाही, असं साळवी यांनी म्हटलं होतं.