ठाणे : भाजी विक्रीच्या आडून चोरी करणाऱ्या चोरट्याला डोंबिवलीतील मानपाडा पोलिसांनी अटक केली आहे. या चोरट्याने कल्याणच्या आडीवली-ढोकळी परिसरात अनेकवेळा चोरी केल्याची माहिती समोर आली आहे. विशेष म्हणजे त्याला दारुचे व्यसन असल्याने तो दारु पिण्यासाठी चोरी करीत असल्याची धक्कादायक बाब समोर आली आहे. कल्याण पूर्वेतील आडीवली-ढोकळी परिसरात काही घरांमध्ये चोरीची घटना घडल्याचं उघडकीस आलं होतं. या प्रकरणात स्थानिक नागरीकांनी माजी नगरसेवक कुणाल पाटील यांच्या पुढाकाराने मानपाडा पोलीस ठाण्यात धाव घेतली. लवकरात लवकर चोरट्याला अटक करा, अशी मागणी पोलिसांकडे केली होती. त्यानंतर अवघ्या काही दिवसांमध्ये चोरट्याला बेड्या ठोकण्यात पोलिसांना यश आलं आहे. मानपाडा पोलीस ठाण्याचे एपीआाय सुरेश डांबरे आणि पीएसआय अनंत लाम सीसीटीव्हीच्या सहाय्याने या प्रकरणाचा तपास करीत होते. एका दिवशी पोलीस गस्तीवर असताना एक व्यक्ती त्यांना दिसला. पोलिसांना त्याचं वागणं संशयास्पद वाटलं. पोलिसांनी विचारपूस केली असता त्याच्याकडे कटर सापडलं. पोलिसांनी तातडीने त्याला ताब्यात घेतलं. त्याची चौकशी केली असता आडीवली ढोकळी चोरी प्रकरणाच्या सीसीटीव्हीत दिसणारा चोरटा हाच होता, ही बाब समोर आली. संबंधित चोरट्याचे नाव बबन जाधव असून तो इगतपुरीला राहतो. तो दिवसा कल्याण-डोंबिवलीत भाजी विक्रीसाठी यायचा. भाजी विक्री करताना तो परिसरातील घरे हेरून ठेवायचा, त्यानंतर तो त्याठिकाणी जाऊन चोरी करायचा. बबनला दारुचे व्यसन आहे. दारुची नशा भाजी विक्रीच्या पैशातून भागत नव्हती. त्यामुळे त्याने चोरी करण्याचा सपाटा लावला होता. या प्रकरणात डीसीपी विवेक पानसरे, एसीपी जेडी मोरे आणि वरिष्ठ पोलीस निरिक्षक दादा हरी चौरे यांनी पत्रकार परिषद घेत या प्रकरणाची माहिती दिली आहे. दरम्यान, बबनने अजून किती चोऱ्या केल्या आहेत, याचा तपास पोलीस करत आहेत.