KDMC महापालिकेतील 18 गावांबाबत मुंबई उच्च न्यायालयाने दिलेल्या निर्णयानंतर भाजप आमदार अतुल भातखळकर यांनी शिवसेनेला जोरदार टोला हाणलाय.

 

मुंबई: कल्याण-डोंबिवली महापालिकेतून 18 गावं वगळण्याच्या राज्य सरकारच्या दोन्ही अधिसूचना मुंबई उच्च न्यायालयानं बुधवारी बेकायदा ठरवून रद्द केल्या. त्यावरुन भाजपचे आमदार अतुल भातखळकर यांनी शिवसेना आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना जोरदार टोला हाणलाय. उच्च न्यायालयाच्या निर्णयामुळे ती 18 गावं आता महापालिकेतच राहणार असल्याचं स्पष्ट झालं आहे. इतकच नाही तर महापालिका निवडणुकीतही या गावांचा समावेश होण्याची चिन्ह आहेत. 

“शिवसेनाला मोठा धक्का; ‘ती’ १८ गावे पालिकेतच. कल्याण-डोंबिवली महापालिकेतून (केडीएमसी) १८ गावे वगळण्याच्या संदर्भात राज्य सरकारने काढलेल्या दोन्ही अधिसूचना मुंबई उच्च न्यायालयाने बुधवारी बेकायदा ठरवून रद्दबातल केल्या… थपडेवर थप्पड… थपडेवर थप्पड…” असं ट्वीट करुन भातखळकर यांनी शिवसेनेला डिवचलं आहे.