वयोवृद्ध नागरिकांना लुटणाऱ्या सराईत चोरट्याला कल्याणच्या दिवाणी न्यायालयाने अडीच वर्षांची शिक्षा ठोठावली आहे

 

ठाणे : दागिने पॉलिश करुन देण्याच्या बहाण्याने वयोवृद्ध नागरिकांना लुटणाऱ्या सराईत चोरट्याला कल्याणच्या दिवाणी न्यायालयाने अडीच वर्षांची शिक्षा ठोठावली आहे. विशेष म्हणजे या आरोपीला गुजरातहून डीसीपी स्कॉडने पकडले होते. त्याच्याविरोधात ठोस पुरावे पोलिसांनी न्यायालयात सादर केले. संबंधित पुराव्यांच्या आधारावर न्यायालयाने आरोपीला अडीच वर्षांची शिक्षा सुनावली आहे.

2018 मध्ये कल्याण पश्चिमेत चिकनघर परिसरात राहणाऱ्या वयोवृद्ध महिला त्यांच्या घरात असताना एक व्यक्ती त्यांच्या घरासमोर आला. माझ्याकडे एक पावडर आहे, त्या पावडरने काळे पडलेले दागिने चमकवून निघतात, असं त्याने सांगितलं. वयोवृद्ध महिलेने तिचे काही दागिने या व्यक्तिच्या हाती दिले. थोड्या वेळात तो वृद्धेची नजर चुकवून पसार झाला.

याप्रकरणी महिलेचे पती सदाशिव येवले यांनी कल्याणच्या महात्मा फुले पोलीस ठाण्यात तक्रार दिली. पोलिसानी तपास सुरु केला. डीसीपी स्कॉडचे तत्कालीन प्रमुख अविनाश पाळदे  यांच्या पथकाने आरोपीला गुजरातहून अटक केली. आरोपीचे नाव विनोद प्रसाद शहा असे आहे.

विनोद प्रसाद आणि त्याच्या साथीदारांच्या विरोधात मुंबई आणि उपनगरात अशा प्रकारचे पंधरा गुन्हे दाखल आहेत. पोलिसांनी विनोद प्रसादच्या विरोधात भक्कम पुरावे न्यायालयात सादर केले. अखेर वयोवृद्ध नागरिकांना लूबाडणारा भामटा विनोदप्रसाद शहा याला कल्याण न्यायालयाने अडीच वर्षाची शिक्षा सुनावली आहे.

याबाबत सहाय्यक पोलीस निरिक्षक अविनाश पाळदे यांनी टीव्ही 9 मराठीला प्रतिक्रिया दिली. “विनोद प्रसाद याच्याविरोधात सीसीटीव्ही आणि तांत्रिक पुराव्याच्या आधारे त्याला कल्याण न्यायालयात सादर केले गेले. न्यायाधीश ए. आय. आर. कुरेशी यांनी विनोद प्रसाद शहा याला अडीच वर्षांची शिक्षा आणि दहा हजाराचा दंड ठोठावला आहे. विनोदच्या इतर साथीदारांचा शोध सुरु आहे”, अशी माहिती त्यांनी दिली