मेट्रो कारशेडसाठी कांजूरमार्गची जागा न मिळाल्यास ठाकरे सरकारचा प्लॅन बी तयार

 

मुंबईः राज्य सरकारनं मेट्रो ६ प्रकल्पाच्या कारशेडसाठी पर्यायी जागा म्हणून गोरेगाव पहाडीचा विचार सुरू केला आहे. लोखंडवाला-विक्रोळी असा मेट्रो 6 चा मार्ग असून, त्यासाठी गोरेगाव पहाडी येथे कारशेड उभारण्याची राज्य सरकारची तयारी आहे. कांजूरमार्गमधल्या जमिनीवरून सध्या वाद सुरू असून ते प्रकरण कोर्टात आहे. जर कांजूरमार्गची जमीन मेट्रो कारशेडसाठी न मिळाल्यास प्लॅन बी म्हणून गोरेगाव पहाडीच्या जागेचा मेट्रो कारशेडसाठी विचार केला जाऊ शकतो.

गोरेगाव पहाडीची जागा मेट्रो कारशेडसाठी द्यावी, अशी विनंती एमएमआरडीएनं राज्य सरकारकडे केलीय. जर ही जमीन ताब्यात घ्यायची असल्यास त्या जमिनीच्या मालकाला मालकी हक्क सोडण्यासाठी भरपाई द्यावी लागेल. गोरेगाव पहाडीमध्ये भागातील 129.10 हेक्टरपैकी 89 हेक्टर जमीन सरकारनं मेट्रो यार्डसाठी ताब्यात घेतलेली आहे. त्यातील मेट्रो 6 प्रकल्पाचे 30 टक्के काम पूर्णसुद्धा झालेय. आता एमएमआरडीएला कारशेडसाठी गोरेगाव पहाडी भागातील आणखी 18 हेक्टर जमीन हवी आहे.

एमएमआरडीएचा मेट्रो 6 प्रकल्पासाठी कारशेड कांजूरमार्गला तयार करायचा प्लॅन आहे. कुलाबा-वांद्रे- सीप्झ मेट्रो 3 प्रकल्पाचे कारशेड आरेमध्ये उभारलं जात होतं. पण त्याला पर्यावरण प्रेमींनी विरोध केल्याने ते कांजूरमार्गला हलवण्यात आलं. तसेच वडाळा- ठाणे या मेट्रो चार मार्गाचेही काम सुरू झाले. त्यामुळे कारशेडचा प्रश्न लवकर मार्गी लागणं आवश्यक आहे.

”आमचा कांजूरमार्गला कारशेड उभारण्याचा विचार आहे. पण न्यायालयानं तिकडे कारशेड तयार करण्यास स्टे दिलाय. त्यामुळे आम्ही प्लॅन बीचा विचार केलेला असून, मेट्रो 6 प्रकल्पासाठी गोरेगाव पहाडी भागात कारशेड उभारले जाऊ शकते,” असं राज्य सरकारनं स्पष्ट केलंय. मेट्रो 6 प्रकल्प हा 16 किलोमीटरच्या टप्प्याचा असून, तो जोगेश्वरी-विक्रोळी लिंक रोड आणि विक्रोळी-लोखंडवालादरम्यान बांधण्यात येणार आहे. या प्रकल्पाची किंमत अंदाजे 6691 कोटी रुपये आहे. 16 डिसेंबर रोजी मुंबई उच्च न्यायालयाने कांजूरमार्गच्या 102 एकर मिठागराच्या जागेवर मेट्रो कारशेड उभारण्यास स्थगिती दिली होती, आता या निर्णयावर फेब्रुवारी 2021मध्ये सुनावणी होणार आहे.

मेट्रो कारशेड बीकेसीत उभारण्याचीही चर्चा

मेट्रो कारशेडचा प्रकल्प वेळेत पूर्ण व्हावा म्हणून बीकेसीचा पर्याय पुढं आल्याचं नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे यांनी म्हटलंय. कांजूरमार्ग मेट्रो कारशेडला उच्च न्यायालयानं स्टे दिलाय. त्यानंतर ठाकरे सरकार पर्यायी जागांचा शोध घेतंय. त्यातूनच बीकेसीत मेट्रो कारशेडसाठी जागेची चाचपणी सरकारनं सुरु केलीय. तसे आदेशही सरकारनं दिलेत. कांजूरमार्ग मेट्रो कारशेड प्रकरण कोर्टात किती काळ चालेल याचा अंदाज नाही. त्यामुळे मेट्रोचा प्रकल्प वेळेत पूर्ण करण्यासाठीच बीकेसीचा पर्याय पुढं आल्याचं शिंदे म्हणालेत. बीकेसी ग्राऊंड हे २० हेक्टरमध्ये पसरलंय आणि त्याची मालकी ही एमएमआरडीएकडे आहे, त्यामुळे त्याचं अधिग्रहण करणं राज्य सरकारला सहज शक्य होणार आहे.