यंदा नवीन वर्षाचे स्वागत घरीच साध्या पद्धतीने करण्याचे महापौर - महापालिका आयुक्तांचे ठाणेकरांना आवाहन

 


ठाणे(30): कोरोनाचा संसर्ग कमी झाला असला तरी नागरिकांची होणारी गर्दी टाळण्यासाठी यंदा सरत्या वर्षाला निरोप देत नवीन वर्षाचे स्वागत घरीच राहून, साध्या पद्धतीने साजरे करण्याचे आवाहन ठाणे शहराचे प्रथम नागरिक महापौर नरेश गणपत म्हस्के आणि महापालिका आयुक्त डॉ. विपिन शर्मा यांनी ठाणेकरांना केले आहे. 

     सरत्या वर्षाला निरोप देऊन नवीन वर्षाच्या स्वागतासाठी लहान मुलांपासून ते वयोवृद्ध मोठ्या उत्साहाने सहभागी होवून आनंद लुटत असतात. धार्मिक तसेच सार्वजनिक ठिकाणी एकत्र येवून आनंद साजरा करत असतात. सध्यस्थितीत कोरोनाचा संसर्ग असल्याने नागरिकांनी विशेष काळजी घेणे आवश्यक आहे. तथापि कोरोनाच्या पार्श्वभूमीवर राज्य शासनाने मार्गदर्शक नियमावली जाहीर केली असून त्या अनुषंगाने महापालिकेनेदेखील मार्गदर्शक तत्वे तयार केली असून नवीन वर्षाचे स्वागत घरीच राहून साजरे करण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

      नवीन वर्षाच्या स्वागताचा उत्सव यंदा कोरोनाच्या जागतिक महामारीत सापडला आहे. आपण सर्वजण या महामारीचा यशस्वी सामना करीत असलो तरीही नवीन वर्षाचे स्वागत करताना सर्वांची विशेष काळजी घेणे गरजेचे आहे. उत्सव साजरा करताना प्रशासनाने घातलेल्या नियमांचे काटेकोरपणे पालन करून सा

ध्या पद्धतीने साजरे करण्याचे आवाहन महापौर नरेश गणपत म्हस्के आणि महापालिका आयुक्त डॉ. विपिन शर्मा यांनी ठाणेकरांना केले आहे. 

      ठाणे शहरात कोरोनाचे नवे रुग्ण सापडण्याचे प्रमाण खूपच कमी झाले आहे. तसेच कोरोनामुक्त होणाऱ्या रुग्णाच्या टक्केवारीतही वाढ झाली आहे. ब्रिटनमधील कोरोनाच्या नव्या प्रकारामुळे प्रशासनाच्यावतीने विशेष खबरदारी घेण्यात येत आहे. नवीन वर्षाच्या स्वागतासाठी बहुसंख्य नागरिक घराबाहेर पडून सार्वजनिक ठिकाणी एकत्र येवून आनंद व्यक्त करत असतात. त्या पार्श्वभूमीवर महापालिकेने नियमावली तयार केली असून नागरिकांनी त्याचे पालन करण्याचे आवाहन करण्यात आले आहे. यामध्ये सार्वजनिक ठिकाणी गर्दी करू नये, फटाके वाजवू नयेत, जमावाने रस्त्यावर फिरू नये, तसेच वयोवृद्ध नागरिक तसेच लहान मुलांनी विशेष काळजी घेण्याचे आवाहन महापालिकेच्यावतीने करण्यात आले आहे.