मंदिरात जाताना कोणते कपडे घालावेत, हे आपल्या देशाची संस्कृती सांगते : रोहित पवार.

 

अहमदनगर: शिर्डीच्या साईबाबांच्या मंदिरात भारतीय पेहरावाची सक्ती करणाऱ्यावरुन निर्माण झालेल्या वादात आता राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार रोहित पवार यांनी उडी घेतली आहे. रोहित पवार यांनी या प्रकरणावरून साई संस्थानाला अप्रत्यक्ष टोला लगावला आहे. देवळात येताना काय कपडे घालायचे, हे लोकांना कळते, असे रोहित पवार यांनी सांगितले. (NCP leader Rohit Pawar on Shirdi Sai Temple Dress Code notice)

रोहित पवार यांनी गुरुवारी अहमदनगरमध्ये प्रसारमाध्यमांशी संवाद साधला. यावेळी त्यांना शिर्डीत साई संस्थानाकडून लावण्यात आलेल्या वादग्रस्त फलकाविषयी प्रतिक्रिया विचारण्यात आली. त्यावर रोहित पवार यांनी साई संस्थानाला अप्रत्यक्षरित्या फटकारले. मंदिरात जाताना कोणते कपडे घालावेत, हे आपल्या देशाची संस्कृती सांगते. लोकांना ही गोष्ट कळते. मात्र, तरीही आपण मंदिरात फलक लावणार असू तर ती गोष्ट योग्य नाही. भारतीय संविधानात तसे सांगितले आहे, असे मत रोहित पवार यांनी व्यक्त केले.

काय आहे वाद?

काही दिवसांपूर्वी साईबाबा संस्थानकडून शिर्डी मंदिराच्या परिसरात फलक लावण्यात आले होते. तोकडे कपडे खालून साईमंदिरात येऊ नका. दर्शन घेण्यासाठी भक्तांनी भारतीय पेहरावात यावं, असा मजकूर यावर लिहला होता. यावरुन वाद निर्माण झाला होता. गोमाता ब्रिगेडच्या अध्यक्षा तृप्ती देसाई यांनी यावर आक्षेप घेतला होता.

तृप्ती देसाई पोलिसांच्या ताब्यात

तृप्ती देसाई यांनी साई संस्थानाच्या निर्णयाला विरोध केला होता. त्यानंतर ब्राम्हण महासंघाने आक्रमक होत साई संस्थानाची भूमिका योग्य असल्याचे सांगितले होते. तृप्ती देसाई शिर्डीत आल्यास आम्ही त्यांच्या तोंडाला काळे फासू, अशा इशाराही देण्यात आला होता.
या पार्श्वभूमीवर गुरुवारी तृप्ती देसाई शिर्डीत येणार होत्या. मात्र, पोलिसांनी त्यांना अहमदनगरच्या सीमेवर असणाऱ्या सुपे टोलनाक्यावर ताब्यात घेतले होते. यावेळी पोलीस आणि तृप्ती देसाई यांच्यात झटापटही झाली होती. पोलिसांनी तृप्ती देसाई यांना ताब्यात घेतल्यानंतर शिवसेनेकडून शिर्डीत फटाके वाजवून आनंद साजरा करण्यात आला होता.