रक्ताच्या थारोळ्यातील ‘त्या’ तरुणीला सहा दिवसांनी शुद्ध, कसा झाला घटनेचा उलगडा?

नवी मुंबई : वाशी खाडी ब्रीज रेल्वे रुळालगत मंगळवारी सकाळी 21 वर्षीय तरुणी जखमी अवस्थेत सापडली होती. या घटनेमुळे रेल्वे पोलिसांसमोर मोठे आव्हान निर्माण झाले होते. टिटवाळा पोलिसांनी पुढील तपास सुरु केला होता. नुकतंच या घटनेतील पीडित तरुणीला सहा दिवसांनी शुद्ध आली आहे. त्यामुळे या घटनेचा उलगडा झाला आहे. 

मंगळवारी (22 डिसेंबर) एक तरुणी वाशी खाडी ब्रीज जवळ रेल्वे ट्रकच्या बाजूला रक्ताच्या थारोळ्यात पडली होती. त्यानंतर वाशी रेल्वे पोलिसांनी त्वरीत या जखमी तरुणीला रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले होते. ती तरुणी अधर्वट बेशुद्ध अवस्थेत ही तरुणी तिचे नाव ,आईचे नाव आणि टिटवाळा हे तीन शब्द उच्चारीत होती.

या घटनेतील पीडित तरुणीला तब्बल सहा दिवसांनी शुद्ध आली आहे. यानंतर या पीडित तरुणीचा पोलिसांनी जबाब नोंदवला होता. या जबाबात तिने स्वतःचा तोल गेल्याने ती खाली पडली, असे सांगितले. तसेच तिच्यावर कोणताही अतिप्रसंग झालेला नाही, हेही उघड झाले आहे.

दरम्यान तरुणीने दिलेला हा जबाब आणि पोलिसांच्या तपास यात सुसंगता आढळली आहे. मात्र या तरुणीच्या वैद्यकीय अहवालात तिच्यावर बलात्कार झाल्याची शक्यता वर्तवण्यात आली होती. मात्र आता नमूद गुन्ह्यात 307, 376 प्रमाणे गुन्हा घडला नसल्याचे निष्पन्न झाले आहे.

तरुणीच्या कुटुंबाला 16 तासात शोधले

या घटनेनंतर कल्याण रेल्वे पोलिसांना पत्ता आणि वारस शोधण्याची जबाबदारी दिली गेली. रेल्वे पोलीस मंगळवारी टिटवाळ्यात पोहचले. त्यांनी संपूर्ण टिटवाळा पिंजून काढला. यावेळी 16 तासानंतर कल्याण जीआरपीने तिच्या आई वडिलांना शोधून काढले.

पोलिसांच्या माहितीनुसार ही तरुणीचे आई वडिल टिटवाळ्यात राहतात. ती तरुणी पवईला एका उच्चभ्र सोसायटीतील घरात घर काम करते. ती आठवड्यातून केवळ एक दोन दिवस आई वडिलांना भेटण्यासाठी टिटवाळ्यात येते. ही तरुणी वाशीला कशी पोहचली.  तिला जीवे ठार मारण्याचा प्रयत्न कोणी केला आहे याचा तपास सुरू होता.

तरुणी अद्याप बेशुद्ध आहे. जोर्पयत ती शुद्धीवर येत नाही. तोर्पयत या प्रकरणी काही बोलणे योग्य नाही. आमच्या पद्धतीने तपास सुरु आहे, असं पोलिसांनी सांगितले होते. मात्र त्यानंतर ही तरुणी शुद्धीवर येताच तिचा कबुली जबाब पोलिसांनी नोंदवला आहे. यामुळे या घटनेचा सर्व गोष्टींचा उलगडा झाला आहे.