पुणे: शिर्डी साईबाबा मंदिर संस्थानने मंदिरात दर्शनासाठी येणाऱ्या भाविकांना भारतीय पोशाखात येण्याची विनंती केली आहे. तसा फलक शिर्डी संस्थानकडून लावण्यात आला आहे. याला भूमाता ब्रिगेड तृप्ती देसाई यांनी जोरदार आक्षेप घेतला आहे. आज शिर्डीमध्ये जात मंदिर संस्थानने लावलेला ड्रेसकोड सक्तीचा बोर्ड काढणारच असा निर्धारच देसाई यांनी पुण्यात बोलून दाखवला आहे.
तृप्ती देसाई यांच्या इशाऱ्यानंतर शिर्डीमध्ये मोठा पोलिस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. देसाई यांना 11 डिसेंबरपर्यंत शिर्डीमध्ये प्रवेशबंदी करण्यात आली आहे. असं असलं तरीही आज शिर्डीमध्ये जाऊन ड्रेसकोड सक्तीचा बोर्ड काढणार असल्याचा दावा देसाई यांच्याकडून करण्यात आला आहे. या पार्श्वभूमीवर कोणताही अनुचित प्रकार घडू नये, यासाठी शिर्डीमध्ये जागोजागी पोलिस तैनात करण्यात आले आहेत.
तृप्ती देसाईंची भूमिका काय ?
साई मंदिरातील तो फलक काढून टाकण्याचे आवाहन देसाई यांनी केलेले आहे. अनेक मंदिरात, अगदी शिर्डी मंदिरातसुद्धा पुजारी अर्धनग्न अवस्थेत असतात. यावर अर्धनग्न पुजाऱ्यांना मंदिरात प्रवेश नाही असा बोर्ड भक्तांनी कधीही लावलेला नाही, असं त्यांनी म्हटलंय. तसेच, जर साई संस्थानने तो फलक काढला नाही; तर आम्हाला येऊन त्याला काढावे लागेल, असा ईशाराही देसाई यांनी साई संस्थानला दिलेला आहे.
साई संस्थानचे भक्तांना काय आवाहन?
फक्त महाराष्ट्रच नव्हे तर संपूर्ण भारतात जागृत देवस्थान म्हणून प्रसिद्ध असलेल्या शिर्डीतील साईमंदिरात ‘तोकडे कपडे घालून येऊ नये. भक्तांनी भारतीय पेहरावात साईमंदिरात यावं,’ असं आवाहन साईबाबा संस्थानकडून करण्यात आलं आहे. मंदिरात भारतीय पेहरावात यावं, अशा आशयाचे फलकदेखील साईबाबा मंदिर परिसरात लावण्यात आले आहेत. “साईबाबांचे दर्शन घेण्यासाठी अनेक जण तोकडे कपडे घालून येत असल्याचे निरीक्षणात आले आहे. तीर्थस्थळी येताना भारतीय पेहरावात यावं,” असं साईबाबा संस्थानचे कार्यकारी अधिकारी कान्हूराज बगाटे यांनी सांगितलं
दरम्यान, देसाई यांनी शिर्डीला जाणार असल्याचे जाहीर केल्यामुळे साई मंदिरात लावलेल्या त्या बोर्डामुळे वातावरण तापण्याची शक्यता आहे.