नवी मुंबईतील एपीएमसी मार्केट उद्या बंद; माथाडी कामगारही संपावर

नवी मुंबई: गेल्या 11 दिवसांपासून दिल्लीत सुरु असलेल्या शेतकरी आंदोलनाचा वणवा आता देशभरात पसरला आहे. या पार्श्वभूमवीर मंगळवारी भारत बंद आंदोलनाची हाक देण्यात आली आहे. या आंदोलनाला महाराष्ट्रातून मोठ्याप्रमाणावर पाठिंबा मिळण्याची शक्यता आहे. त्याचाच एक भाग म्हणून शुक्रवारी नवी मुंबईतील कृषी उत्पन्न बाजार समिती (एपीएमसी) बंद ठेवण्यात येणार आहे. येथील माथाडी कामगारांनीही उद्या काम बंद ठेवण्याचा निर्णय घेतला आहे. शेतकरी आंदोलनाला पाठिंबा देण्यासाठी शुक्रवारी नवी मुंबईसह देशातील प्रमुख बाजारपेठा बंद राहणार आहेत. त्यामुळे नागरिकांची गैरसोय होण्याची शक्यता आहे. नवी मुंबईच्या एपीएमसी मार्केटमध्ये राज्यभरातून भाजीपाला आणि धान्याच्या गाड्या येतात. त्यानंतर याच बाजारपेठेतून मुंबई आणि लगतच्या परिसरात भाजीपाला व अन्नधान्याचा पुरवठा होतो. मात्र, शुक्रवारी ही बाजारपेठ बंद राहणार असल्याने भाजीपाला आणि इतर गोष्टींची आवकही बंद राहणार आहे. त्यामुळे नागरिकांना भाजीपाला आणि इतर आवश्यक गोष्टींचा साठा करून ठेवण्याचे आवाहन करण्यात आले आहे.