कर्मचाऱ्यांनी 23 डिसेंबर रोजी कोविड सेंटरमध्ये काम बंद आंदोलन केले.

 

ठाणे : कल्याण डोंबिवली महापालिकेचे डोंबिवली जिमखाना येथे कोविड सेंटर (KDMC Covid Center) आहे. या कोविड सेंटरमध्ये काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांचा पगार कोविड सेंटर चालविणाऱ्या कंत्राटदाराने थकविला आहे. त्याच्या निषेधार्थ कर्मचाऱ्यांनी 23 डिसेंबर रोजी कोविड सेंटरमध्ये काम बंद आंदोलन केले. त्यामुळे कोविड सेंटममध्ये गोंधळाचे वातावरण निर्माण झाले होते. या प्रकरणाची दखल घेत भाजप नेते किरीट सोमय्या यांनी डोंबिवलीतील जिमखाना कोविड सेंटरमध्ये धाव घेतली.किरीट सोमय्या यांच्यासोबत भाजप आमदार रविंद्र चव्हाण हे देखील होते. कोविड सेंटरमध्ये भाजप नेते सोमय्या यांनी पीपीई कीट घालून रुग्णांची विचारपूस केली. तसेच पाहणी केली. यावेळी पगार थकलेल्या वार्डबॉय, नर्स आणि अन्य कामगारांनी त्यांच्याकडे व्यथा मांडली. “पीपीई कीट घालून काम करणे जिकरीचे होते. काही नर्स आणि वार्डबॉय हे लांबून कामाला येतात. त्यांना नोव्हेंबर महिन्याचा पगार दिलेला नाही. पगार मागायला गेल्यावर कंत्रटदाराकडून कामावरुन काढून टाकण्याची भाषा केली जाते”, अशी तक्रार एका नर्सने केली. या सगळ्या व्यथा भाजप नेते सोमय्या यांनी स्वत: ऐकून घेतल्या. त्यांनी महापालिकेच्या आरोग्य अधिकाऱ्यांशी यावेळी चर्चा केली. ज्या कंत्रटदाराला डोंबिवली जीमखाना येथील कोविड सेंटर चालविण्यास दिले आहे. त्या कंत्रटदाराला अन्य ठिकाणी ही कोविड सेंटरचे कंत्राट दिले आहे. कर्मचाऱ्यांना 15 हजार रुपये पगार देण्याचे कंत्रटदाराने कबूल केले आहे. मात्र, कंत्राटदार त्यांना केवळ 10 हजार रुपयेच पगार देत आहे. कामगारांचा पगार थेट त्यांच्या खात्यात जमा झाला पाहिजे. कंत्राटदाराच्या कामाचे आणि अर्थकारणाचे विशेष लेखा परिक्षण करा, अशी मागणी भाजप नेते सोमय्या यांनी यावेळी केली आहे. “राज्यात कोरोना रुग्णांची संख्या जास्त होती. त्यावेळी आरोग्य यंत्रणा पुरविण्याकरीता रुग्णांसाठी कोविड सेंटर उभारणे गरजेचे होते. मात्र आत्ता राज्यात केरोनाचे रुग्ण कमी होत आहे तरीदेखील मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या हस्ते ठाण्यात दोन कोविड  सेंटरचे उद्घाटन करण्यात आले. ही कोविड सेंटर कंत्राटराच्या फायद्यासाठी सुरु करणे हेच ठाकरे सरकारचे लक्ष्य आहे का?”, असा सवाल किरीट सोमय्या यांनी यावेळी उपस्थित केला.