काँग्रेसनं सावध व्हावं, पक्षाचे 18 नगरसेवक राष्ट्रवादीत केल्यानंतर काँग्रेसच्या वरिष्ठ नेत्याचा इशारा.

मुंबई : कॉंग्रेसचे भिवंडी-निजामपूर महानगरपालिकेतील 18 नगरसेवक राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये गेल्यानंतर महाराष्ट्र काँग्रेसच्या एका वरिष्ठ नेत्याने काँग्रेसला सावध होण्याचा इशारा दिलाय. महाराष्ट्र काँग्रेसचे सरचिटणीस विनायकराव देशमुख यांनी भिवंडी-निजामपूर नगरपालिकेच्या 18 काँग्रेस नगरसेवकांचा राष्ट्रवादीतील प्रवेश गंभीरपणे घेण्याचा सल्ला दिलाय. देशमुख यांनी पक्षाच्या कार्यकर्त्यांना खुलं पत्र लिहून सावध होण्याचा इशारा दिलाय. भिवंडी-निजामपूर नगरपालिकेतील काँग्रसच्या उपमहापौरांसह 18 नगरसेवकांनी उपमुख्यमंत्री अजित पवार आणि कॅबिनेट मंत्री जयंत पाटिल यांच्या उपस्थितीत राष्ट्रवादीत प्रवेश केला. देशमुख म्हणाले, “हे प्रकरण सावध होण्यासारखं आहे, अन्यथा परिस्थिती हाताबाहेर जाईल. काँग्रेस पक्षाने केवळ महाराष्ट्र विकास आघाडीचा घटक होऊन आणि सरकारमध्ये मंत्रिपद घेऊन समाधानी व्हायला नको.”