मुंबई : “राज्यपाल भगतसिंह कोश्यारी हे सुज्ञ आहेत. राज्यपालांवर आमचं प्रेम आहे आणि त्यांचंही आमच्यावर प्रेम आहे. त्यामुळे ते महाविकास आघाडीच्या नेत्यांनी राज्यपाल नियुक्त १२ सदस्यांची नाव नाकरणार नाहीत,” अशी खोचक प्रतिक्रिया शिवसेना खासदार संजय राऊत यांनी दिली. तसेच “अभिनेत्री उर्मिला मातोंडकर या स्पष्टवक्ता आहेत, त्यांचा महाराष्ट्राला नक्कीच फायदा होईल,” असेही राऊतांनी यावेळी सांगितले.
महाविकास आघाडीच्या नेत्यांनी राज्यपाल नियुक्त 12 सदस्यांच्या नावाची यादी काल(6 नोव्हेंबर) राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांना सादर केली. यावर संजय राऊतांनी प्रतिक्रिया दिली.
“राज्यपाल हे सुज्ञ आहे. राज्यपालांवर आमचं प्रेम आहे आणि त्यांचंही आमच्यावर प्रेम आहे. ते किती प्रेम आहे हे देशाला माहिती आहे आणि या प्रेमातून यापुढे सर्व कारभार सुरळीत होईल. आम्ही राज्यपालांचा नेहमी आदर करतो. राज्यपाल घटनाबाह्य काम करणार नाहीत. ते 12 जणांची यादी नाकारणार नाहीत,” असे संजय राऊत म्हणाले.
“अभिनेत्री उर्मिला मातोडकरांचे नाव शिवसेनेच्या यादीत आहे. उर्मिलासारखी स्पष्टवक्ता, देशासह महाराष्ट्राच्या घडामोडींची माहिती असणारी अभिनेत्री जर संसदेत जाईल, तर त्याचा निश्चितच फायदा होईल,” असेही संजय राऊतांनी यावेळी सांगितले.