मुंबई : रिपब्लिक टीव्हीचे संपादक अर्णव गोस्वामी यांच्याबरोबर गैरवर्तन करणाऱ्या 9 पोलिसांना तात्काळ निलंबित करा, अशी मागणी भाजपाचे आमदार राम कदम यांनी केली आहे. या मागणीसाठी आमदार राम कदम यांनी काळी फित बांधून महाराष्ट्र सरकारचा पुतळा जाळला. तसेच मंत्रालयाच्या समोर गांधी स्मारकासमोर उपोषण करणार असल्याचंही राम कदम यांनी सांगितलं आहे.
लोकशाहीचा चौथा आधारस्तंभ म्हणजे पत्रकारितेवरील हल्ला आहे. पत्रकारांच्या अभिव्यक्ती स्वातंत्र्याची गळचेपी केली जात आहे. अर्णव गोस्वामी यांची तातडीने सुटका करा आणि सूडबुद्धीने केलेले त्यांच्यावर आणि त्यांच्या कुटुंबावरील आरोप मागे घ्या, अर्णव यांच्याबरोबर गैरवर्तन करणाऱ्या 9 पोलिसांना निलंबित करा, या मागणीवरुन आमदार राम कदम यांनी काळी फित बांधून महाराष्ट्र सरकारचा पुतळा जाळला. महाराष्ट्रातल्या अप्रत्यक्ष आणीबाणीविरोधात उपोषण करणार असल्याची घोषणाही भाजपाच्या राम कदम यांनी केली आहे. भाजप आमदार राम कदम यांना मरीन लाईन्स पोलिसांनी ताब्यात घेतले आहे, मंत्रालयाच्या समोर उपोषणाला बसलेल्या राम कदम यांना ताब्यात घेतले आहे. अर्णव गोस्वामी यांना सोडावं या मागणीसाठी राम कदम यांनी मंत्रालयासमोर उपोषण सुरू केलेलं होतं. पोलीस स्टेशनमध्ये सुद्धा आपलं लाक्षणिक उपोषण सुरूच राहील, असं त्यांनी म्हटलेले आहे.