मुंबई : जनमानसांवर अधिराज्य गाजविणारे थोर व्यक्तिमत्व, व्यंगचित्रकार आणि द्रष्टे विचारवंत स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे यांच्या नावे मुंबई विद्यापीठात सुरू करण्यात आलेले अध्यासन केंद्र दीपस्तंभ म्हणून उभारण्यात येणार आहे. यंदाच्या शैक्षणिक वर्षापासून विद्यार्थ्याना प्रवेशासाठी मुंबई विद्यापीठाचा प्रयत्न असणार आहे. या अध्यासन केंद्रात व्यंगचित्रकार, साहित्यिक, कला या विद्यार्थ्यांना अभ्यासक्रमाचा लाभ होणार आहे.
स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे यांच्या आठवणींना उजाळा देण्यासाठी मुंबई विद्यापीठातर्फे स्मृतिगंध हा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता.
महाराष्ट्राच्या जडणघडणीत अतुलनीय योगदान दिलेल्या बाळासाहेबांच्या नावाने अध्यासन केंद्र सुरू झाले आहे. या केंद्रात अनेक विषयावर सखोल अभ्यास करून एक आदर्शवत पिढीच्या निर्माण केले जाणार आहे. बाळासाहेबांचे कार्य, त्यांची शिकवण आणि त्यांच्या कार्यांची ऊर्जा घेऊन पुढील पिढीला आदर्शप्रवण बनविण्यासाठी बाळासाहेब ठाकरे यांच्या नावे अध्यासन केंद्र सुरू केले आहे.
या केंद्राच्या माध्यमातून पुढील पिढीला उर्जा आणि प्रेरणा मिळेल असा आशावाद राज्याचे उच्च आणि तंत्रशिक्षण मंत्री उदय सामंत यांनी व्यक्त केला.
यासाठी तत्कालीन शासनाच्या वेळी प्रस्ताव सादर करून हे केंद्र नावारूपाला आणण्यात आले आहे. यासाठी शासनाने भरघोस आर्थिक तरतूदही केली आहे. एक महत्त्वपूर्ण अध्यासन केंद्र म्हणून हे केंद्र नावारूपाला येईल, अशी प्रतिक्रिया राज्याचे माजी उच्च आणि तंत्र शिक्षण राज्यमंत्री रविंद्र वायकर यांनी दिली.