मुंबई : “आपण दरवर्षी मोठं-मोठे फटाके फोडतो. मात्र यंदा दिवाळीत फटके न फोडता ती साधेपणाने साजरी करा,” असे आवाहन मुंबईच्या महापौर किशोरी पेडणेकर यांनी केलं आहे. यंदा दिवाळीत लक्ष्मीपूजन वगळता मुंबईत फटाके फोडण्यास बंदी घालण्यात आली आहे. नुकतंच मुंबईत फटाके फोडण्यासंबंधी महापालिकेने नियम आणि मार्गदर्शक सूचना जारी करण्यात आल्या आहेत. त्याबाबत किशोरी पेडणेकरांनी ही प्रतिक्रिया दिली आहे.
“मुंबईत यंदा दिवाळीत लक्ष्मीपूजनाचा दिवस वगळता फटाक्यांवर बंदी घालण्यात आली आहे. लक्ष्मीपूजनच्या दिवशीही केवळ खासगी क्षेत्रात सौम्य स्वरुपाचे फटाके फोडण्यास परवानगी देण्यात आली आहे. येत्या 14 नोव्हेंबरला लक्ष्मीपूजनाच्या दिवशी खाजगी ठिकाणी म्हणजे घरातील अंगण आणि सोसायटी आवारात सौम्य स्वरुपाचे फटाके फोडता येणार आहे. यात अनार आणि फुलबाजा हेच फटाके फोडता येतील. रॉकेट किंवा अन्य मोठ्या फटाक्यांवर मात्र बंदी असेल,” असे महापौर म्हणाल्या.
दरम्यान “यंदा फटाके न फोडता सर्वसामान्य नागरिकांनी दिवाळी साजरी करा,” असे आव्हान मुंबईच्या महापौरांनी केलं आहे. “आपण दरवर्षी फटाके फोडतो, पण यंदाची दिवाळी वेगळी आहे, त्यामुळे ती साधेपणाने साजरी करा, असे किशोरी पेडणेकर म्हणाल्या.”
“कोरोनाची परिस्थिती आहे , त्यामुळे सर्वजण सुरक्षित असणं गरजेचं आहे. त्यामुळे यंदाची भाऊबीज ही भावाच्या घरी जाऊन साजरी न करता ऑनलाईन पद्धतीने साजरी करा. मी सुद्धा ऑनलाईन भाऊबीज करणार आहे,” असे किशोरी पेडणेकरांनी सांगितले.
दिवाळीच्या पार्श्वभूमीवर मुंबईतील मार्केटमध्ये मुंबईकरांनी खरेदीसाठी मोठी गर्दी केली आहे. त्यामुळे कोरोनाचा संसर्ग वाढण्याची शक्यता असल्याने महापालिकेने आज तातडीने दिवाळी निमित्ताने नियमावली जारी करून फटाके फोडण्यास मज्जाव केला आहे. तसेच भाऊबीजेच्या दिवशी बहिणीने भावाला ओवाळताना शक्यतो व्हिडीओ कॉलद्वारे ओवाळावे, तर भावाने देखील शक्यतो ऑनलाईन पद्धतीनेच ओवाळणी द्यावी, अशी सूचनाही पालिकेने केली आहे.
हॉटेल, जिमखाना परिसरातही फटाके फोडण्यास बंदी
मुंबईतील सार्वजनिक परिसर, खासगी परिसर इत्यादी सर्व ठिकाणी कोणत्याही प्रकारचे फटाके फोडता येणार नाहीत किंवा तत्सम स्वरुपाची आतशबाजी महानगरपालिका क्षेत्रात कुठेही करता येणार नाही. तसेच हॉटेल, क्लब, जिमखाना, संस्था, व्यवसायिक परिसर, विविध समूह इत्यादींद्वारे आणि त्यांच्याशी संबंधित परिसरांमध्ये कोणत्याही प्रकारचे फटाके फोडता येणार नाहीत किंवा तत्सम स्वरुपाची आतशबाजी आणि त्या संबंधीचे कार्यक्रम करता येणार नाहीत, असंही पालिकेने नमूद केलं आहे.