कल्याण : कल्याणमधील बहुचर्चित आणि बहुप्रतीक्षित पत्री पुलाचा (Patri Bridge) गर्डर बसवण्यास अखेर सुरुवात झाली आहे. दोन वर्षांपासून रखडलेल्या पत्री पुलाच्या कामाला आता वेग येण्याची शक्यता आहे. गर्डर बसवण्याच्या कामासाठी आज आणि उद्या (शनिवार 21 नोव्हेंबर आणि रविवार 22 नोव्हेंबर) मध्य रेल्वेवर चार तासांचा विशेष ब्लॉक घेण्यात येत आहे. पत्री पूल बसवताना पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे उपस्थित राहून गर्डर बसवताना स्वतः जातीने लक्ष घालणार आहेत.
ब्लॉकच्या काळात 250 लोकल रद्द करण्यात आल्या आहेत, परंतु कल्याण-डोंबिवली मार्गावर विशेष लोकल सोडण्यात येणार आहेत. कल्याणच्या पत्री पुलासाठी 700 मेट्रीक टनाचा गर्डर तयार करण्यात आला आहे. हा गर्डर बसवण्यासाठी मोठ्या क्रेनचा वापर केला जाणार आहे. पूलाचे गर्डर हैद्राबाद येथील कंपनीत तयार करण्यात आले आहेत.
कल्याण पूर्व आणि पश्चिमेला जोडणाऱ्या पत्रीपुलाचं गेल्या दीड वर्षांपेक्षा जास्त कालावधीपासून काम सुरु आहे. यामुळे नागरिकांना प्रचंड वाहतूक कोंडीचा सामना करावा लागत आहे. मात्र गर्डर टाकल्याने कामाला वेग येण्याची अपेक्षा असून नवीन वर्षाच्या सुरुवातीस पत्री पूल पूर्णत्वास येण्याची चिन्हं आहेत.
ब्रिटीशकालीन पत्रीपूल वाहतुकीसाठी धोकादायक झाल्याने 2018 मध्ये पाडण्यात आला होता. कल्याण रेल्वे मार्गावर हा पूल असल्याने कल्याण शीळ मार्गाला जाणारा हा महत्त्वाचा रस्ता आहे. हा पूल मार्गी लावण्यासाठी शिवसेना खासदार श्रीकांत शिंदे यांनी सातत्याने पाठपुरावा सुरु ठेवला आहे. या पुलाच्या कामात काही तांत्रिक अडचणी येत होत्या.