पनवेल : ऐन दिवाळीत पनवेलमधून गुन्ह्याची एक धक्कादायक घटना समोर आली आहे. पनवेलमधल्या तळोजा इथं पतीने पत्नीची चाकू भोकसून हत्या करण्याचा प्रयत्न केला. सगळ्यात धक्कादायक बाब म्हणजे पत्नीवर चाकू हल्ला केल्यानंतर पतीने रेल्वे खाली जाऊन आत्महत्या केली. या घटनेमुळे संपूर्ण परिसरात खळबळ उडाली असून पोलीस तपास करत असल्याची माहिती देण्यात आली आहे.
दिवाळीच्या खास सणालाच पती-पत्नीमध्ये वाद शुल्लक कारणावरून वाद झाला. हा शाब्दिक वाद इतका गेला की यामध्ये पतीने रागाच्या भरात पत्नीच्या पोटात चाकू भोकसून स्वतः तळोजा रेल्वे ट्रॅकखाली आत्महत्या केली आहे. सकाळी साडे आठ वाजता नावडे फेस 1 इथं ही घटना घडली.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, तळोजा फेस 1 मध्ये निलकमल अपार्टमेंटमध्ये अर्चना निर्गुडे आणि पती गणेश दुर्गुडे राहत होते. पण सणासुदीच्या दिवशीच दोघांमध्ये घरगुती कारणामुळे टोकाचा वाद झाला. गंभीर म्हणजे चाकू हल्ला करून पत्नीला ठार करण्याच्या प्रयत्नात अर्चना गंभीर जखमी झाली. सदर घटना लक्षात येताच शेजाऱ्यांनी तात्काळ तिला उपचारासाठी एमजीएम रुग्णालयात दाखल केलं. तर अर्चना दुर्गुडे यांची मृत्यूशी झुंज सुरू असल्याची माहिती डॉक्टरांकडून देण्यात आली आहे.
पत्नीवर वार केल्यानंतर आरोपी पती गणेश याने तळोजा रेल्वे ट्रॅकवर रेल्वेखाली उडी मारून आत्महत्या केल्याची माहिती देण्यात आली आहे. मात्र, नेमका वाद इतक्या टोकाला का गेला? याबाबत तळोजा पोलीस सखोल चौकशी करत आहेत.
दरम्यान, पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत पतीचा मृतदेह ताब्यात घेतला असून तो शवविच्छेदनासाठी नजिकच्या स्थानिक रुग्णालयात पाठवण्यात आला आहे. शुल्लक वादामध्ये ऐवढा मोठा गुन्हा का घडला याचा सध्या पोलीस तपास करत आहेत. अधिक माहिती मिळवण्यासाठी पोलीस अधिकारी शेजारी आणि प्रत्येक्षदर्शींचीही चौकशी करणार असल्याची माहिती देण्यात आली आहे.