मुंबई : विधानपरिषदेवरील राज्यपाल नियुक्त जागांच्या निवडणुकीवरून काँग्रेसमध्ये नाराजीनाट्य पाहायला मिळत आहे. अनिरुद्ध वनकर आणि मुजफ्फर हुसैन यांच्या उमेदवारीवरुन पक्षात नाराजी असल्याची चर्चा आहे. तर तिकीट डावलल्याने काँग्रेसचे नेते नसीम खानही नाखुश असल्याचं बोललं जातं.
सचिन सावंत, रजनी पाटील, मुजफ्फर हुसैन आणि अनिरुद्ध वनकर यांना काँग्रेसकडून विधानपरिषदेवरील राज्यपाल नियुक्त सदस्यत्वासाठी उमेदवारी देण्यात आली आहे. आंबेडकर चळवळीतील गीतकार आणि संगीतकार असलेल्या अनिरुद्ध वनकर यांच्या नावावरुन विदर्भातील काही काँग्रेस नेत्यांमध्ये नाराजी होती. मात्र नाराजीकडे दुर्लक्ष करत वनकर यांनी संधी मिळाल्याने काही जण नाराज असल्याची माहिती आहे.
कोण आहेत अनिरुद्ध वनकर?
- अनिरुद्ध वनकर यांचं विदर्भातील साहित्य क्षेत्रात मोठं नाव
- आंबेडकरी चळवळीतील मोठे गीतकार आणि संगीतकार
दुसरीकडे, मिरा भाईंदरमधील काँग्रेस नेते मुजफ्फर हुसैन यांना तिसऱ्यांदा विधानपरिषदेवर संधी देणे मुंबई काँग्रेसमधील नेत्यांना नापसंत असल्याची चर्चा आहे. या आधी हुसैन दोन वेळा काँग्रेसकडून विधान परिषदेवर निवडून आले होते. मात्र पुन्हा त्यांनाच संधी दिल्यामुळे पक्षात काही जण नाराज असल्याची माहिती आहे. हुसैन हे महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे कार्यकारी अध्यक्ष आहेत.
दुसरीकडे, विधानपरिषदेवर संधी न मिळाल्याने काँग्रेसचे नेते नसीम खान नाराज असल्याचंही बोललं जातं. नसीम खान हे महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे उपाध्यक्ष आहेत. आघाडी सरकारच्या काळात त्यांनी वस्त्रोद्योग मंत्रालयाची जबाबदारी सांभाळली आहे.
रजनी पाटील यांना संधी
रजनी पाटील यांना काँग्रेसने राज्यसभेवर पुन्हा संधी दिली आहे. रजनी पाटील या मराठवाड्यातील बीडच्या माजी लोकसभा खासदार आहेत. रजनी पाटील यांनी राज्यसभेची खासदारकी याआधीही भूषवली आहे. सध्या त्या हिमाचल प्रदेशच्या काँग्रेस प्रभारी आहेत.
याआधी महाराष्ट्र युवक काँग्रेसचे अध्यक्ष सत्यजीत तांबेही नाराज असल्याची चर्चा होती. तांबेंचं नावही विधानपरिषदेच्या शर्यतीत मानलं जात होतं. मात्र उमेदवारी जाहीर झाल्यानंतर ‘श्रद्धा आणि सबुरी’ असं सूचक ट्विट करत त्यांनी नाराजी व्यक्त केल्याचं म्हटलं जातं.