मुंबई: ‘मिशन बिगीन अगेन’ अंतर्गत राज्यातील जनजीवन पूर्वपदावर येत असल्याने आता राजकीय पक्षांनीही मरगळ झटकून कामाला सुरुवात केली आहे. मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे डिसेंबरमध्ये मुंबईत मेळावा घेण्याचा निर्णय जाहीर केला. त्यामुळे दिवाळी नंतर राज ठाकरे काय राजकीय फोडणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
गेल्या काही दिवसांमध्ये महाराष्ट्र नवनिर्माण सेनेत जोरदार इनकमिंग सुरु असल्याचे दिसत आहे. आज नवी मुंबईतील शेकडो कार्यकर्त्यांनी राज ठाकरे यांच्या उपस्थितीत मनसेत प्रवेश केला. यावेळी बोलताना राज ठाकरे यांनी डिसेंबरमध्ये मुंबईत मेळावे घेणार असल्याचं सांगितलं. तसेच नवी मुंबईतील या कार्यकर्त्यांना कामाला लागण्याच्या सूचनाही त्यांनी दिल्या.
काही दिवसांपूर्वीच पुण्यातील युवासेनेचे उपनेते संग्राम माळी यांनी मनसेत प्रवेश केला होता. तत्पूर्वी शिवडी आणि वरळीतील शिवसेनेच्या अनेक कार्यकर्त्यांनीही मनसेचा झेंडा हाती धरला होता. आगामी मुंबई महानगरपालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर ही बाब मनसेसाठी फायदेशीर मानली जात आहे. त्यानंतर आता नवी मुंबईतील विविध पक्षाचे कार्यकर्ते मोठ्याप्रमाणावर मनसेत दाखल झाल्याने नवी मुंबईतील मनसेची ताकद वाढण्यास मदत होणार असल्याचं बोललं जात आहे.
दरम्यान, राज्यात काँग्रेसने शेतकरी विरोधी आंदोलने घेण्यास सुरुवात केली आहे. तर भाजपने विविध मुद्द्यावरून राज्यात धरणे, मोर्चे काढण्यास सुरुवात केली आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी मोजक्याच लोकांच्या उपस्थितीत शिवसेनेचा दसरा मेळावाही घेतला. शिवाय अनेक सामाजिक संघटनांकडूनही मोर्चे आणि परिषदा घेणे सुरू आहे. या पार्श्वभूमीवर मनसेनेही मेळावा घेण्याचं घोषित केल्याने या मेळाव्याकडे संपूर्ण राज्याचं लक्ष लागलं आहे. या मेळाव्यात राज ठाकरे काय बोलणार? केंद्र आणि राज्य सरकारच्या धोरणांवर राज ठाकरे काय भाष्य करणार? याकडेही सर्वांचं लक्ष लागलं आहे.
दरम्यान, जिओ कंपनीच्या आक्रमक धोरणामुळे धंदा धोक्यात आल्याचे गाऱ्हाणे घेऊन मुंबईतील केबलचालकही राज यांना आज भेटले. जिओ कंपनीकडून विनापरवाना कनेक्शन देण्याचे काम सुरु आहे. त्यासाठी झाडे, रस्ते आणि वीजेच्या खांबांवरुनही केबल टाकल्या जात आहेत. जिओ कंपनीमुळे बाजारपेठेत निर्माण झालेल्या स्पर्धेचा सामना करण्यासाठी इन मुंबई, हॅथवे, डीजे आणि सिटी केबल या कंपन्या एकत्र आल्या आहेत. मात्र, जिओच्या प्रचंड रेट्यामुळे आमचा व्यवसाय धोक्यात आल्याचे गाऱ्हाणे केबलचालकांनी राज यांच्याकडे मांडले.