अण्णासाहेब पाटील आर्थिक विकास महामंडळ बरखास्त; नवी मुंबईच्या मार्केटमध्ये माथाडी कामगारांचा संप


नवी मुंबई: अण्णासाहेब पाटील आर्थिक विकास महामंडळ बरखास्त करण्याच्या निर्णयाविरोधात बुधवारी नवी मुंबईतील माथाडी कामगारांनी संपाचे हत्यार उपसले आहे. नवी मुंबईच्या एपीएमसी कांदा मार्केटमधील माथाडी कामगारांनी काम बंद केले आहे. त्यामुळे कांदा-बटाटा मार्केटमध्ये आलेल्या 120 गाड्या तशाच उभ्या आहेत. माथाडी कामगारांचे नेते नरेंद्र पाटील हे अण्णासाहेब पाटील आर्थिक मागास विकास महामंडळाचे अध्यक्ष होते. राज्य सरकारने महामंडळ बरखास्त केल्याने त्यांचे अध्यक्षपद गेले. त्यामुळे माथाडी कामगार नाराज असल्याचे समजते. 


नवी मुंबई एपीएमसी मार्केटमध्ये कांदा बटाटा,फळ,भाजीपाला, धान्य व मसाला मार्केटमध्ये हजारो संख्येने माथाडी कामगार काम करतात. त्यामुळे एपीएमसी बाजारपेठेतील इतर व्यवहारही ठप्प होण्याची शक्यता आहे.


तत्पूर्वी भाजपचे राज्यसभेतील खासदार छत्रपती संभाजीराजे यांनीही राज्य सरकारच्या या निर्णयाचा जोरदार निषेध केला होता. महामंडळ बरखास्त करायचे तर ते आधीच करायला हवे होते. आता त्यांचा टायमिंग चुकलंय, अशी टीका भाजपचे खासदार संभाजीराजेंनी केली. तातडीने महामंडळाचे पुनर्गठन करून मराठा समाजाला न्याय देण्याची मागणीही संभाजीराजे यांनी केली.


ज्या अण्णासाहेब पाटलांनी मराठा समाजासाठी बलिदान दिले, त्यांच्या नावाने असलेल्या महामंडळाचे नेतृत्व त्यांचेच चिरंजीव सक्षमपणे करत असताना, ते महामंडळ बरखास्त का केलं? सरकारचा तो अधिकार असेलही, पण ही वेळ नव्हती. समाजात याबाबत अक्रोश निर्माण झाला आहे, असे संभाजीराजे यांनी म्हटले होते.


नरेंद्र पाटील राज्य सरकार टीका करत असल्याने महामंडळ बरखास्त?


अध्यक्ष नरेंद्र पाटील गेल्या काही दिवसांपासून सार्वजनिक बांधकाम मंत्री अशोक चव्हाण यांच्यावर टीका करत होते. त्यामुळेच अण्णासाहेब पाटील आर्थिक मागास विकास महामंडळाच्या अध्यक्षांसह संचालक मंडळ बरखास्त निर्णय घेण्यात आल्याची राजकीय वर्तुळात चर्चा आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या आदेशाने मंडळाच्या सर्व नेमणुका रद्द करण्यात आल्या आहेत. मराठा समाजाला हा एक प्रकारे मोठा धक्का असल्याचं समजलं जात आहे.