दिवाळीत प्रार्थनास्थळं उघडल्यामुळेच कोरोनाचे रुग्ण वाढले: किशोरी पेडणेकर


मुंबई: दिवाळीत राज्यातील प्रार्थनास्थळे उघडल्यामुळेच कोरोना रुग्णाची संख्या वाढली, असे वक्तव्य महापौर किशोरी पेडणेकर (Kishori Pednekar) यांनी केले. मुंबईत कोरोनाची दुसरी लाट आलेली नाही. मात्र, ती येण्यास वेळही लागणार नाही. कोरोना खूप वाईट आहे, तो अजून संपलेला नाही. त्यामुळे योग्य काळजी न घेतल्यास हाहा:कार उडेल, अशी भीती महापौर किशोरी पेडणेकर यांनी व्यक्त केली. 


दिवाळीनंतर राज्याच्या काही भागांमध्ये कोरोना रुग्णांची संख्या वाढल्याचे निदर्शनास आले आहे. या पार्श्वभूमीवर महापौर किशोरी पेडणेकर यांनी शुक्रवारी ‘टीव्ही 9 मराठी’शी संवाद साधला. यावेळी त्यांनी लोकल ट्रेन आणि शाळा सुरु करण्याबाबत अजूनही सबुरी बाळगली पाहिजे, असे मत व्यक्त केले. शाळा सुरु झाल्या की ‘माझं कुटुंब, माझी जबाबदारी’, या मोहिमेत खंड पडेल. सोशल मीडियावरही पालक शाळा उघडू नका, हेच म्हणत आहेत. त्यामुळे मुंबई परिसरातील शाळा 31 डिसेंबरपर्यंत बंद ठेवण्याचा निर्णय घेतल्याचे महापौरांनी सांगितले.


लोकल ट्रेन सुरु झाल्यास कोरोना सर्वदूर पसरण्याचा धोका आहे. ट्रेन सुरु झाल्यास सर्व शहरांमध्ये कोरोनाचा प्रादुर्भाव शिगेला पोहोचू शकतो. परिणामी मुंबईत बिकट परिस्थिती उद्भवेल. त्यामुळे तुर्तास रेल्वे सुरु होऊ नये, हे माझे प्रामाणिक मत असल्याचे किशोरी पेडणेकर यांनी सांगितले.


या सगळ्यावरून एक-दोन टक्के लोक उगीचच कांगावा करत आहेत. त्यांना बोलू द्या, आम्हाला फरक पडत नाही. लोकांचा जीव महत्त्वाचा आहे. बाकी सगळं नंतर पाहू, असे किशोरी पेडणेकर यांनी सांगितले.


दिल्लीत कोरोनाची दुसरी लाट, मुंबईकरांनो सावधान, पालिका आयुक्तांचे आवाहन


गेल्या काही दिवसांपासून दिल्लीत कोरोनाची दुसरी लाट आल्याचे पाहायला मिळत आहे. दिल्लीत कोरोनाचे रुग्ण सातत्याने वाढत आहे. तसेच त्या ठिकाणी कोरोनामुळे मृत्यू होणाऱ्यांच्या संख्येतही झपाट्याने वाढ होत आहे. या पार्श्वभूमीवर मुंबई महापालिका आयुक्त इक्बाल सिंग चहल यांनी मुंबईकरांनी सावधानता बाळगण्याचे आवाहन केले आहे.


राज्यात सध्या जरी कोरोना नियंत्रणात असला तरी दिवाळीनंतर कोरोनाचा प्रादुर्भाव वाढू शकतो, असे बोलले जात आहे. दिल्लीत गेल्या काही दिवसांपासून कोरोना रुग्णसंख्या वाढत चालली आहेत. त्या पार्श्वभूमीवर मुंबई महापालिकेकडून विविध उपाययोजना करण्यात येत आहेत. मुंबईत कोरोनाची स्थिती वाढू नये, याची काळजी घेत आहे.