अर्जुन रामपाल एनसीबी कार्यालयात दाखल


मुंबई : ड्रग्ज प्रकरणी समन्स मिळाल्यानंतर अभिनेता अर्जुन रामपाल चौकशी साठी एनसिबी कार्यालयात दाखल झाला आहे. अर्जुन रामपाल यांची मैत्रीण गॅब्रिएला डेमेट्रियड्स (Gabriella demetriades)  हिची एनसीबीने दोनवेळा चौकशी केली. यावेळी अभिनेता अर्जुन रामपाल यालाही चौकशीसाठी समन्स पाठवण्यात आले होते. अर्जुन रामपालला शुक्रवारी सकाळी दहा वाजता चौकशीसाठी एनसीबी कार्यालयात हजर राहण्यास सांगण्यात आले होते.


सोमवारी (9 नोव्हेंबर) अर्जुन रामपालच्या घरावर आणि आसपासच्या परिसरावर एनसीबी पथकाने छापा टाकला होता. या धाडीत अर्जुन रामपालच्या घराची तपासणी करण्यात आली. या दरम्यान त्याच्या घरातून अनेक कागदपत्रे आणि वस्तू जप्त करण्यात आल्या आहेत. तब्बल 7 ते 8 तास हे धाडसत्र सुरू होते. त्यानंतर एनसीबी अधिकाऱ्यांनी अनेक संशयास्पद वस्तू जप्त केल्या. तसेच, अर्जुनच्या वाहन चालकाला ताब्यात घेतले होते.


अर्जुनच्या मित्राला अटक


एनसीबी बॉलिवूड ड्रग्ज कनेक्शन प्रकरणात त्यांच्या तपासणीची व्याप्ती सातत्याने वाढवत आहे. दरम्यान, अर्जुन रामपालच्या हालचालींवर लक्ष ठेवून असणाऱ्या एनसीबीने मोठी कारवाई केली आहे. अर्जुन रामपालचा मित्र पॉल बार्टेलला एनसीबीने अटक केली आहे. अर्जुन रामपाल ड्रग्ज प्रकरणात चौकशीसाठी एनसीबीसमोर हजर होणार आहे आणि त्याचवेळी या प्रकरणात त्याच्या मित्राला अटक करण्यात आल्याने त्याच्या अडचणींत देखील वाढ झाली आहे.


पॉल हा ऑस्ट्रेलियन असून, तो एका मोठ्या बांधकाम कंपनीत काम करतो. तो आर्किटेक्ट आहे. त्याचप्रमाणे एनसीबी अधिकाऱ्यांनी अर्जुन रामपाल यांच्या घरी सोमवारी धाड टाकली होती. यावेळी काही टॅबलेट त्या ठिकाणी सापडले होते. या टॅबलेट भारतात विकण्यास बंदी आहे. त्या अर्जुन रामपाल यांनी त्या टॅबलेटबाबत अजून काही खुलासा केलेला नाही. त्या टॅबलेटबाबत त्यांनी योग्य तो खुलासा न केल्यास त्यांना अटक होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.


ड्रग्ज प्रकरणात अर्जुनच्या मेहुण्याचे नाव


या आधी एनसीबीने अर्जुन रामपालची गर्लफ्रेंड गॅब्रिएला डेमेट्रियड्सच्या भावाला ताब्यात घेतले होते. तपासादरम्यान त्याचे नाव समोर आल्याने अ‍ॅगिसिलोस डेमेट्रियड्सला अटक करण्यात आली असल्याचे एनसीबी अधिकाऱ्यांनी सांगितले होते.


दक्षिण अफिकेचा नागरिक असलेला अ‍ॅगिसिलोस एनसीबी अधिकाऱ्यांनी अटक केलेल्या ड्रग्ज तस्काराच्या संपर्कात होता. त्याचे नाव समोर आल्याने त्याला स्थानिक न्यायालयासमोर हजार करण्यात आले होते. त्यानंतर त्याला पोलीस कोठडी सुनावण्यात आली. मात्र, आता त्याची जामिनावर सुटका करण्यात आली आहे.