बाप दाखव नाहीतर श्राद्ध कर; संजय राऊतांचं किरीट सोमय्यांना आव्हान



तक्रार जमिनीच्या व्यवहाराबाबत नसून भगिनीचे कुंकू पुसण्याबाबत आहे. शेठजी, जरा जपून, असं म्हणत शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी भाजपा नेते किरीट सोमय्यांवर पलटवार केला.


मुंबईः अन्वय नाईक यांच्याशी 21 व्यवहार केल्याची थाप सोमय्या महोदयांनी मारली. आम्ही म्हणतोय आता बाप दाखव नाहीतर श्राद्ध कर. एका भगिनीचे कुंकू पुसल्याचे दु:ख या व्यापारी अवलादीस नाही. तक्रार जमिनीच्या व्यवहाराबाबत नसून भगिनीचे कुंकू पुसण्याबाबत आहे. शेठजी, जरा जपून, असं म्हणत शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी भाजपा नेते किरीट सोमय्यांवर पलटवार केला. ट्विट करत त्यांनी भाजपा नेते किरीट सोमय्या यांना खडे बोल सुनावले.


तत्पूर्वी भाजप नेते किरीट सोमय्या यांनी आज पुन्हा एकदा मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि माजी मंत्री रवींद्र वायकर यांच्यावर जमीन खरेदी व्यवहार प्रकरणी आणखी आरोप केले होते. ठाकरे-वायकर कुटुंबीयांच्या नावावर 21 सातबारा उतारे आहेत. त्यामुळे जमिनी खरेदी करणे हा तुमचा व्यवसाय आहे का? हे मुख्यमंत्र्यांनी स्पष्ट करावे, असं आवाहन किरीट सोमय्या यांनी केलं होतं. तुम्ही राज्याचे मुख्यमंत्री आहात म्हणूनच हा प्रश्न करत आहे. सामान्य व्यक्ती असता तर विचारलंही नसतं, असा टोलाही सोमय्या यांनी लगावला होता. त्यालाच आता संजय राऊतांनी प्रत्युत्तर दिलं आहे.


किरीट सोमय्या यांनी आज सलग दुसऱ्या दिवशी पत्रकार परिषद घेऊन ठाकरे-वायकर परिवाराच्या जमीन खरेदी व्यवहारावर लक्ष वेधतानाच अन्वय नाईक आणि ठाकरे परिवाराचे काय आर्थिक संबंध आहेत? असा सवाल केला होता. उद्धव ठाकरे यांचा जमीन खरेदीचा व्यवसाय आहे का? त्यांचा जमिनीत गुंतवणूक करण्याचा व्यवसाय आहे का? रेवदंड्यातच जमिनी खरेदी करण्याचे कारण काय?, ठाकरे आणि अन्वय नाईक कुटुंबीयांचा आर्थिक संबंध काय? या दोन्ही कुटुंबात किती जमिनींचा व्यवहार झाला?, असा प्रश्नांचा भडिमार सोमय्या यांनी केला होता.


ठाकरे-वायकर कुटुंबांच्या नावावर 21 जमिनींचे सातबारे उतारे आहेत. दोन्ही कुटुंबांनी 21 जमिनींचे आर्थिक व्यवहार केले असून त्यांनी त्यांच्या पत्नींच्या नावावर हे व्यवहार केले आहेत. वायकर हे शिवसैनिक आहेत. त्यांच्याशी ठाकरे परिवाराचा जमिनी व्यवहारात संबंध कसा आला? हे समजून घेण्याचा मी प्रयत्न करत आहे. ठाकरे आणि वायकर कुटुंब जमिनींचे व्यवहार का करत आहेत? हा प्रश्न मला पडलेला आहे. मित्र किंवा नातेवाईक म्हणून एकत्र आला असाल तर तसं जाहीर करावं, असं आवाहनही सोमय्या यांनी केलं होतं.