नवी मुंबई: गेल्या काही दिवसांपासून वधारलेले भाज्यांचे भाव खाली आले आहेत. नवी मुंबईत एपीएमसी घाऊक बाजारात गेल्या काही दिवसांत भाज्यांच्या दरात मोठी वाढ झाली होती. भाजीपाला मार्केटमध्ये आज एकूण 520 गाड्यांची आवक झाली आहे. त्यामुळे भाज्यांच्या दरात मोठी घसरण झाल्याचं पाहायला मिळत आहे. परतीच्या पावसानं झालेल्या नुकसानामुळे गेल्या काही दिवसांपासून नवी मुंबई एपीएमसी मार्केटमध्ये भाज्यांचे भाव कडाडले होते.
अतिवृष्टीमुळे भाजीपाल्याचं मोठं नुकसान झालं होतं. त्यामुळे मार्केटमध्ये भाज्यांची आवक घटली होती. आता ही आवक वाढल्याचं पाहायला मिळत आहे. त्यामुळे मागील आठवड्यात 30 ते 40 रुपये प्रति किलो दराने विकला जाणारा कोबी, कारली, टोमॅटो, दुधी भोपळा, शिमला मिर्ची, लवंगी मिर्ची, काकडी आज 5 ते 10 रुपये किलोने विकला जात आहे. तर भेंडी 10 रु. किलो आणि कोथिंबरी 8 रुपये जुडी अशा भावात विकली जातेय. दरम्यान घाऊक बाजारात कमी किमतीत मिळणारा भाजीपाला किरकोळ बाजारात मात्र दुप्पट भावात विकला जात आहे.
नवी मुंबई एपीएमसी मार्केटमध्ये आज जवळपास 520 गाड्यांची आवक झाली आहे. तर छटपुजेमुळे मार्केटमध्ये ग्राहकही नाही. त्यामुळे बाजारात 60 टक्के भाजीपाला शिल्लक आहे. अशावेळी व्यापारी आणि शेतकऱ्यांना फटका बसण्याची शक्यता आहे.
आजचे बाजारभाव (प्रति किलो)
फ्लॉवर – 8 ते 10 रुपये
कोबी – 8 ते 12 रुपये
काकडी – 6 ते 10 रुपये
मिरची – 10 ते 12 रुपये
टोमॅटो – 15 ते 20 रुपये
वांगी – 8 ते 10 रुपये
कोथिंबीर – 5 रुपये जुडी
मेथी – 5 ते 10 रुपये
पालक – 5 रुपये
वाटाणा – 40 रुपये
सुरक्षारक्षकाला मारहाण
कृषी उत्पन्न बाजार समिती (APMC) प्रशासनाकडून मार्केटमध्ये कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी विविध प्रकारच्या उपाययोजना करण्यात येत आहेत. तर दुसऱ्या बाजूला फळ मार्केटमधील एच आणि एम विंगमध्ये व्यापार करणाऱ्या व्यापाऱ्यांकडून सर्व प्रकारच्या नियमांचे उल्लंघन केलं जात असल्याचं पाहायला मिळालं होतं. इथले व्यापारी आणि मजूर नियमांचे पालन करत नाहीत, तसेच तिथे असलेल्या सुरक्षारक्षकांशी हुज्जत घालतात. काही दिवसांपूर्वी मास्क न वापरणाऱ्यांवर कारवाई करणाऱ्या सुरक्षारक्षाकाला काही मजुरांनी मारहाण केली होती. याप्रकरणी एपीएमसी पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करण्यात आला आहे.