नवी दिल्ली: बिहार विधानसभा निवडणुकीतील (Bihar Election results 2020) काँग्रेसच्या निराशाजनक कामगिरीमुळे राहुल गांधी (Rahul Gandhi) यांना जैसलमेरमधील आपली हॉलिडे ट्रिप रद्द करावी लागल्याची माहिती आता समोर येत आहे. राहुल गांधी यांनी वैयक्तिक कारण सांगत ही ट्रिप रद्द केल्याचे समजत आहे.
प्राथमिक माहितीनुसार, राहुल गांधी मित्रांसोबत दोन दिवसांसाठी जैसलमेरमध्ये सुट्टी घालवण्यासाठी येणार होते. बुधवारी सकाळी त्यांचे विमान जैसलमेरमध्ये दाखल होणार होते. ते पंचतारांकित सूर्यगढ फोर्ट हॉटेलमध्ये राहणार असल्याची माहिती होती.
त्यासाठी हॉटेल प्रशासनाला व्हीआयपी मुव्हमेंटच्या सूचना देण्यात आल्या होत्या. सूर्यगढ फोर्टमध्ये 10 लोकांची व्यवस्था करण्यास सांगण्यात आले होते. राहुल गांधी एक रात्र सूर्यगढ हॉटेलमध्ये घालवणार होते. तर दुसरी रात्र ते वाळवंटातील तंबूत घालवणार असल्याचे सांगितले जात होते. मात्र, त्यावेळी काँग्रेसच्या स्थानिक नेत्यांनी राहुल गांधींना भेटण्यासाठी सूर्यगढ फोर्टमध्ये जाऊ नये, अशा सूचनाही देण्यात आल्या होत्या. तर शुक्रवारी राहुल गांधी पुन्हा दिल्लीला जाणार होते.
त्यासाठी राहुल गांधी यांचे विमान आज सकाळी सहा वाजता जैसलमेरमध्ये दाखल होणे अपेक्षित होते. मात्र, बिहार विधानसभा निवडणुकीतील पराभवानंतर राहुल गांधी यांना हा प्लॅन कॅन्सल करावा लागल्याची माहिती आता समोर येत आहे.
बिहार विधानसभा निवडणुकीत काँग्रेसने एकूण 70 जागा लढवल्या होत्या. मात्र, त्यापैकी केवळ 19 जागांवरच काँग्रेसला विजय मिळवता आला. राहुल गांधी यांनी बिहारमध्ये प्रचारासाठी अवघ्या आठ सभा घेतल्या होत्या. राहुल गांधी वगळता राष्ट्रीय स्तरावरील काँग्रेसच्या प्रमुख नेत्यांनी बिहारच्या प्रचारात फारसा रस दाखवला नव्हता. याचा मोठा फटका महागठबंधनला बसला होता.
परिणामी राहुल गांधी आणि काँग्रेस नेत्यांवर पुन्हा एकदा आत्मपरीक्षणाची वेळ ओढावली होती. अशा परिस्थितीत राहुल गांधी सुट्टी घालवण्यासाठी जैसलमेरला गेले असते तर काँग्रेसला आणखी टीकेचा सामना करावा लागला असता. त्यामुळे राहुल गांधी यांनी ही ट्रिप रद्द केल्याची चर्चा आहे.