पालघर हत्याकांडाची सीबीआय चौकशी करा; नारायण राणे यांची मागणी


मुंबई: पालघर साधू हत्याकांडाचा तपास व्यवस्थित झालेला नाही. त्यामुळे या प्रकरणाची सीबीआय चौकशी करण्यात यावी, अशी मागणी भाजप नेते नारायण राणे यांनी केली आहे. तसेच राज्यातील ठाकरे सरकार हे हिंदुत्ववादी सरकार नसून हे तडजोडवादी सरकार आहे, अशी जोरदार टीकाही त्यांनी केली. 


पालघर साधू हत्याकांडप्रकरणाची सीबीआय चौकशी करण्यात यावी या मागणीसाठी भाजप आमदार राम कदम यांनी जनआक्रोश रॅलीचं आयोजन केलं होतं. मात्र, पोलिसांनी कदम यांना ताब्यात घेऊन रॅली काढण्यास मज्जाव केल्याने भाजप नेते नारायण राणे आणि आमदार नितेश राणे खार पोलीस ठाण्यात पोहोचले आणि त्यांनी मध्यस्थी करत राम कदम यांची सुटका केली. त्यानंतर प्रसारमाध्यमांशी बोलताना राणे यांनी ठाकरे सरकारवर जोरदार टीका केली. कोरोना काळात अशा प्रकारचं आंदोलन करू नका अशी विनंती पोलिसांनी राम कदम यांना केली होती. त्यामुळे कदम यांना पोलिसांनी ताब्यात घेतलं होतं, असं सांगतानाच पालघर प्रकरणी राज्य सरकारने पाहिजे तशी चौकशी केली नाही. त्यामुळे हे प्रकरण सीबीआयकडे द्यावे अशी आमची मागणी आहे. त्यासाठीच हे आंदोलन करण्यात आलं आहे, असं राणे म्हणाले.




राज्यात तीन पक्षाचं सरकार आहे. हे तिन्ही पक्ष हिंदूविरोधी आहेत असं म्हणणार नाही. पण शिवसेना हिंदुत्ववादी राहिली नाही. शिवसेनेला मी हिंदुत्ववादी म्हणणार नाही. हे तर तडजोडवादी आहेत. गद्दारी करून शिवसेना सत्तेत आली. पदासाठी त्यांनी तडजोड केली, अशी टीकाही त्यांनी केली.


संघर्ष थांबणार नाही


राम कदम यांनीही जोपर्यंत पालघर हत्याकांडाचं प्रकरण सीबीआयकडे चौकशीसाठी सोपवलं जात नाही तोपर्यंत हा संघर्ष थांबणार नाही, असं स्पष्ट केलं. आज या संघर्षाची ठिणगी पडली आहे. आता संघर्षाचा वणवा पेटेल, असा इशाराही त्यांनी दिला. या सरकारला साधूंचा आक्रोश ऐकू येत नाही. आम्हाला हा आक्रोश ऐकू येतोय. म्हणूनच ज्या ठिकाणी साधूंची हत्या झाली. त्या ठिकाणी दिवा पेटवून या साधूंना श्रद्धांजली वाहण्यासाठी आम्ही जात होतो. तरीही आम्हाला मज्जाव करण्यात आला. दिवा पेटवणं हा काही गुन्हा आहे का?, असा सवाल करतानाच 212 दिवस झाले तरी सरकार या प्रकरणाचा न्याय करू शकली नाही. पोलीसही सरकारच्या दबावात आहेत. हे सरकार झोपलं आहे. त्यामुळेच हे प्रकरण सीबीआयकडे सोपवण्यात यावे, अशी मागणी कदम यांनी केली. आज संघर्ष सुरू झाला. आता रस्त्यावरचा संघर्ष करू. आम्ही थांबणार नाही, असा इशाराही त्यांनी दिला.


दरम्यान, पालघर जिल्ह्यातील गडचिंचले हत्याकांडात मारलेल्या साधूच्या नावाने दिवा लावण्यासाठी जमलेल्या भाजपच्या कार्यकर्त्यांना पोलिसांनी ताब्यात घेतले होते. गडचिंचले येथे आयोजित केलेल्या या कार्यक्रमासाठी आमदार राम कदम आले असता पोलिसांनी त्यांना पालघरमध्ये येण्यास मज्जाव केला. त्यामुळे मनोर येथे भाजप पदाधिकारी व कार्यकर्ते जमा झाले होते. पोलिसांनी यावेळी दहा ते पंधरा जणांना ताब्यात घेतले होते.