मुंबई : येत्या सोमवारपासून राज्यातील नववी, दहावी आणि बारावीचे वर्ग सुरू करण्याचा निर्णय शालेय शिक्षण विभागाने घेतला आहे. मात्र मुंबईतील वाढती कोरोना रुग्णसंख्या लक्षात घेता मुंबईत शाळा सुरु होणार नाहीत, असे आदेश मुंबई महापालिका आयुक्त इक्बालसिंग चहल यांनी दिले आहेत. त्यानुसार येत्या 31 डिसेंबरपर्यंत मुंबईतील शाळा या बंदच ठेवण्यात येणार आहे.
राज्यात सध्या जरी कोरोना नियंत्रणात असला तरी दिवाळीनंतर कोरोनाचा प्रादुर्भाव वाढू शकतो, असे बोलले जात आहे. दिल्लीत गेल्या काही दिवसांपासून कोरोना रुग्णसंख्या वाढत चालली आहेत. त्या पार्श्वभूमीवर मुंबई महापालिकेकडून विविध उपाययोजना करण्यात येत आहेत. मुंबईत कोरोनाची स्थिती वाढू नये, याची काळजी घेत आहे.
येत्या २३ नोव्हेंबरपासून शाळा सुरु करण्याचा निर्णय घेण्यात आला होता. पण आता दिल्लीतील परिस्थिती पाहता 31 डिसेंबरपर्यंत सर्व शाळा बंद ठेवण्याचा निर्णय मुंबई महापालिकेने घेतला आहे. कोरोनाची स्थिती जर वाढली तर विद्यार्थ्यांना त्याचा संसर्ग होऊ शकतो. त्यामुळे खबरदारी म्हणून पालिका प्रशासनाने हा निर्णय घेतला आहे.
दरम्यान नववी, दहावी आणि बारावीचे वर्ग सुरु होणार की नाही, याबाबत अद्याप कोणतीही स्पष्टता देण्यात आलेली नाही. काही वेळातच याबाबतच परिपत्रक पालिकेकडून जारी केले जाणार आहे.