सॅमसंगने भारतीय मार्केटमध्ये शाओमीवर मात करत पहिलं स्थान बळकावलं आहे.


मुंबई : Xiaomi आणि Samsung या दोन स्मार्टफोन कंपन्या गेल्या दोन वर्षांपासून भारतीय मार्केटमध्ये अनुक्रमे पहिल्या आणि दुसऱ्या नंबरवर होत्या. या काळात दोन्ही कंपन्यांमध्ये मोठी रस्सीखेच पहायला मिळाली. परंतु गेल्या काही महिन्यांमध्ये किफायतशीर किंमतीत नवनव्या फिचर्ससह सॅमसंगने अनेक जबरदस्त मॉडेल्स लाँच केले. त्याच्याच जोरावर सॅमसंगने भारतीय मार्केटमध्ये शाओमीवर मात करत पहिलं स्थान बळकावलं आहे. 


सॅमसंग आणि शाओमी या दोन कंपन्यांनंतर विवो, रियलमी आणि ओप्पो या कंपन्यांचा अनुक्रमे तिसरा, चौथा आणि पाचवा क्रमांक लागतो. या तिन्ही कंपन्यांचा मार्केट शेअर 17 टक्के, 16 टक्के आणि 8 टक्के इतका आहे. काऊंटरपॉईंट रिसर्चने म्हटले आहे की, मार्केटची ही परिस्थिती फार काळ नसेल. पुढील तिमाहीत शाओमी कंपनी पुन्हा पहिल्या स्थानावर कब्जा करेल.


मार्केट रिसर्च फर्म काऊंटरपॉईंट रिसर्चच्या रिपोर्टनुसार सॅमसंगच्या स्मार्टफोनच्या विक्रीत गेल्या दोन वर्षात 32 टक्क्यांची वाढ झाली आहे. त्यामुळे कंपनीने भारतीय मार्केटमध्ये शाओमीवर मात केली आहे. काऊंटरपॉईंट रिसर्चनुसार सॅमसंगने 2020 च्या तिसऱ्या तिमाहीत 24 टक्के मार्केट शेअरवर कब्जा केला आहे. तर शाओमीचा मार्केट शेअर 23 टक्के इतका आहे.


लॉकडाऊन हटवल्यानंतर देशभरात स्मार्टफोन्सची मागणी वाढली आहे. त्यामुळेच सणासुदीच्या निमित्ताने ई-कॉमर्स साईट्सवर आयोजित केलेल्या सेल्समध्ये मोठ्या प्रमाणात स्मार्टफोन्सची विक्री झाली आहे. याच संधीचा सॅमसंगने मोठा फायदा उचलला. परिणामी सॅमसंग कंपनी भारतीय मार्केटमध्ये पहिल्या स्थानावर पोहोचली आहे.