मराठा समाजाकडून आरक्षणाचा खेळखंडोबा, ओबीसीतून आरक्षण देण्यास आमचा विरोध : प्रकाश शेंडगे

SEBCचं बिल पास झालं, तेव्हा मराठा समाजाने ढोल बडवले, पेढे वाटले, साखर वाटली आणि आत्ता उपरती झाली. हे ओबीसी समाज कधीही सहन करणार नसल्याचीही भावना त्यांनी व्यक्त केली आहे.



मुंबई : वारंवार अशा मागण्या करून मराठा समाजाने आरक्षणाचा खेळखंडोबा केला. 30 वर्षांपूर्वीही अशीच मागणी केली होती, त्यावेळीही संघर्ष पेटला होता, आता पुन्हा हेच होतंय, या मराठ्यांचा बोलवता धनी कुणी दुसराच आहे, ज्याला आरक्षण द्यायचं नाहीये, अशी टीकाही त्यांनी केली आहे. SEBCचं बिल पास झालं, तेव्हा मराठा समाजाने ढोल बडवले, पेढे वाटले, साखर वाटली आणि आत्ता उपरती झाली. हे ओबीसी समाज कधीही सहन करणार नसल्याचीही भावना त्यांनी व्यक्त केली आहे.ओबीसी मधून मराठ्यांना आरक्षण देण्यास माझा तीव्र विरोध आहे. 3 नोव्हेंबरला राज्यव्यापी आंदोलन करणार असल्याचा इशारा ओबीसी नेते प्रकाश अण्णा शेंडगे यांनी दिला आहे.


कायद्यात अशी तरतूद आहे की ओबीसीतून आरक्षण देता येणार नाही, महाराष्ट्रात दोन समाजांत द्वेष निर्माण करण्याचं काम काही जण करत आहेत. ओबीसी विरुद्ध मराठा वाद पेटवण्याचं षडयंत्र सुरू आहे. मराठा समाजाचं राजकारण होतंय, ओबीसी समाजाचं ताट खेचण्याचा प्रयत्न होतोय, त्यांना SEBCतून आरक्षण मिळू शकतं. या मुद्द्यावर आम्ही ओबीसी समाज बचाव आंदोलन करणार आहोत. 3 तारखेला सर्व तलाठी, तहसील आणि जिल्हाधिकारी कार्यालयाबाहेर आंदोलन करू, असा धमकीवजा इशाराच त्यांनी दिला आहे.