ठाण्यातून तब्बल १ कोटी ३८ लाखांचा ६९१ किलो ग्रॅम गांजा जप्त
ठाणे
शनिवारी पहाटे ३ ते ४ च्या दरम्यान गांजा भरलेला एक ट्रक माजिवडा नाका इथे येणार असल्याची माहिती पोलीस निरिक्षक जितेंद्र राठोड यांना मिळाली होती. त्यानुसार त्यांनी पोलीस उपायुक्त अविनाश अंबुरे यांच्या पथकाला नाकाबंदी साठी रवाना केले. या मोहिमेत चितळसर पोलीसांनी तब्बल १ कोटी ३८ लाखांचा ६९१ किलो ग्रॅम गांजा जप्त केला आहे. तत्वज्ञान विद्यापीठ येथे उभ्या असलेल्या ट्रकची तपासणी केली असता मक्याची कणसे आणि त्याखाली ताडपत्री खाली गांजा या अंमली पदार्थाचा साठा मोठ्या प्रमाणावर मिळून आला. या तपासणीत १ कोटी ३८ लाखांचा ६९१ किलो गांजा आणि २५ लाखांचा अशोक लेलँड कंपनीचा ट्रक असा १ कोटी ६३ लाखांचा मुद्देमाल हस्तगत केला. याप्रकरणी ट्रकवरील अज्ञात चालक आमि मालकाविरूध्द गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
गांजा हा अमली पदार्थ घेऊन ठाण्यात एक ट्रक येणार असल्याची माहिती चितळसर पोलीस स्टेशन मधील पोलीस शिपाई किरण रावते यांना मिळाली होती. मिळालेल्या माहिती नुसार वरिष्ठ पोलीस निरीक्षक जितेंद्र राठोड यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक प्रियतमा मुठे, सहाय्यक पोलीस निरीक्षक शशिकांत रोकडे, पोलीस उपनिरीक्षक धनराज केदार व त्यांच्या पथकाने शनिवारी (१ऑगस्ट) पहाटे ३ वाजेच्या सुमारास घोडबंदर रोड वरील तत्वज्ञान विद्यापीठ जवळ नाकाबंदी केली.
यावेळी घटनास्थळी एक लाल रंगाचा ट्रक बेवारसपणे उभा असल्याचे पोलिसांना आढळून आले. पोलिसांनी या ट्रकची तपासणी केली असता त्यात मक्याची कणसे व त्याखाली गांजा लपवून ठेवल्याचे दिसून आले. पोलिसांनी गांजा व ट्रक जप्त केला. यावेळी ट्रक मध्ये तब्बल ६९१ किलो गांजा मिळून आला. या गांजाची किंमत १ कोटी ३८लाख २० हजाररुपये इतकी असून जप्त ट्रकची किंमत २५ लाख इतकी असल्याचे पोलिसांनी संगीतले. सदर ट्रकचा नंबर केए २८ ए ९०९५ असा असून त्यावरील चालक फरार झाला आहे. या प्रकरणी पोलिसांनी अज्ञात चालक व मालक यांच्या विरोधात एनडीपीएस आक्ट नुसार गुन्हा दाखल केला आहे. हा गांजा कोठून आणण्यात आला व तो ठाण्यात कोणाला सप्लाय करण्यात येणार होता याचा तपास सुरू असल्याचे पोलीस उपआयुक्त अविनाश अंबुरे यांनी सांगितले.