ठाण्यात कशिश पार्क, परबवाडी, रघुनाथनगर परिसरातील रहिवाशांची मोफत पीसीआर टेस्ट
- शिवसेना पक्षप्रमुख, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या वाढदिवसानिमित्त प्रभाग क्रमांक १९ करिता २४ तास अॅम्ब्युलन्सचे लोकार्पण
ठाणे
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या वाढदिवसानिमित्त प्रभाग क्रमांक १९ मधील नागरिकांची पीसीआर टेस्ट (कोविड तपासणी) शिवसेना व सर्बबन डायग्नोस्टिक सेंटर यांच्या वतीने करण्यात आली. यावेळी कार्डियाक अॅम्ब्युलन्सचे लोकार्पणही करण्यात आले. ही अॅम्ब्युलन्स २४ तास परिसरातील रुग्णांसाठी सज्ज राहणार असून त्याचा कशिश पार्क, परबवाडी, मेंटल हॉस्पिटल,रघुनाथनगर भागातील रहिवाशांना या सेवेचा फायदा होणार आहे. कोरोनाकाळात रुग्णवाहिकांची कमतरता ओळखून अॅम्ब्युलन्स उपलब्ध करून दिल्याचे शिवसेनेचे स्थानिक नगरसेवक विकास रेपाळे यांनी याप्रसंगी सांगितले.
ठाण्याच्या कशिश पार्क, परबवाडी, मेंटल हॉस्पिटल, रघुनाथनगर भागातील रहिवाशांची पीसीआर टेस्ट स्थानिक शिवसेना नगरसेवक, शिक्षण समिती सभापती विकास रेपाळे आणि ठाणे पालिकेच्या वृक्ष प्राधिकरण समिती सदस्य नम्रता भोसले - जाधव यांनी सर्बबन डायग्नोस्टिक सेंटर यांच्या संयुक्त विद्यमाने केली. 'मिशन झिरो'कडे वाटचाल करत असताना रुग्णांचा संसर्ग आणि संपर्क कमी करण्याच्या हेतूने त्याचप्रमाणे कोव्हिड रुग्णांना तातडीने उपचार मिळाल्यामुळे मृत्यूदरही कमी करण्याकरिता ही टेस्ट उपयुक्त ठरते. यावेळी परिसरातील दोनशेपेक्षा अधिक नागरिकांची ही मोफत टेस्ट करण्यात आली. त्यातून कोरोनावर मात करणे अधिक सोपे होईल, असे आयोजक विकास रेपाळे यांनी सांगितले. या भागातील नागरिकांच्या सेवेसाठी कार्डियाक अॅम्ब्युलन्सचे लोकार्पणही करण्यात आले. यावेळी शिवसेना शाखाप्रमुख निलेश रेपाळे, युवा सेनेचे उपयुवा अधिकारी रुपेश मिश्रा आणि कशिश पार्क, रघुनाथनगर, परबवाडी शिवसेना शाखेचे पदाधिकारी उपस्थित होते.