मनोरुग्णालयातील गंभीर प्रकाराची मानवी हक्क आयोगाकडे तक्रार करणार
ठाणे
ठाणे मनोरुग्णालयातील निष्काळजीपणामुळे दोघा रुग्णांचा मृत्यू झाला. तसेच मनोरुग्णालयात तब्बल १५०० हून अधिक जणांचा वावर असताना केवळ ३५-४० चाचण्या झाल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. हा प्रकार अतिशय गंभीर असल्याची टीका भारतीय जनता पक्षाचे प्रभारी किरीट सोमैय्या आणि आमदार निरंजन डावखरे यांनी केली. मानवी हक्क आयोगाकडे याबाबत तक्रार करण्यात येणार आहे अशी माहिती त्यांनी एका पत्रकार परिषदेत दिली.
मनोरुग्णालयात दोघा रुग्णांचा कोरोना संसर्गाने मृत्यू झाला. या घटनेच्या पार्श्वभूमीवर किरीट सोमय्या आणि निरंजन डावखरे यांनी काल मनोरुग्णालयाला भेट देऊन तेथील परिस्थितीबाबत अधिकाऱ्यांकडून माहिती घेतली. या ठिकाणी ८५३ रुग्णांवर उपचार सुरू असून, ७१३ कर्मचारी कार्यरत आहेत. तब्बल दीड हजारांहून अधिक जणांचा वावर असूनही, आतापर्यंत केवळ ३५ ते ४० जणांच्या कोरोना चाचण्या झाल्याचे स्पष्ट झाले. या प्रकाराबद्दल दोन्ही नेत्यांनी तीव्र नाराजी व्यक्त केली. या प्रकरणी मानवी हक्क आयोगाकडे तक्रार केली जाणार असल्याचे त्यांनी सांगितले. सध्याच्या भीषण परिस्थितीत राज्यातील ठाणे, येरवडा, नागपूर आणि रत्नागिरी येथील मनोरुग्णालयामध्ये विशेष काळजी घेण्याची आवश्यकता आहे. मनोरुग्णालयात कोरोनाचा संसर्ग पसरल्यास भीषण परिस्थिती निर्माण होईल. राज्यातील सर्व मनोरुग्णालयातील स्थितीकडे मानवी हक्क आयोगाचे लक्ष वेधणार असल्याचं निरंजन डावखरे यांनी यावेळी सांगितले.