लॉकडाऊनमुळे रूग्णसंख्या कमी होईल का याचा महापालिकेने विचार करायला हवा,
ठाणे
एकीकडे वाईन शॉपला होम डिलिव्हरीची परवानगी असताना अन्य वस्तूंच्या विक्रेत्यांनी गुन्हा केला आहे का असा सवाल राम मारुती रोड व्यापारी असोसिएशनचे अध्यक्ष रसिक छेडा यांनी केला आहे. तसेच तत्काळ दुकाने सुरू करण्यास परवानगी देण्याची मागणी महापालिका आयुक्तांकडे केली आहे. राम मारुती रोडवरील व्यापाऱ्यांनी 5 जूनपर्यंत कडक लॉकडाऊन पाळला. सम विषम तारखांना व्यवसायाबरोबरच सोशल डिस्टंसिंगचे पालनही केले. पण ठाणे महापालिकेने अचानक पुन्हा लॉकडाऊन केल्याने व्यापाऱ्यांना मोठा फटका बसला आहे. लॉकडाऊनमध्ये दुकानं बंद ठेवण्याच्या महापालिकेच्या आदेशाचा ठाण्यातील राम मारूती रस्त्यावरील व्यापा-यांनी तीव्र विरोध केला आहे.
मुंबईत दुकाने उघडी असल्याने ग्राहक तिकडे जात आहेत. आमचा केवळ 10 ते 20% उरलेला व्यवसायही महापालिका करू देत नाही. वाईनशॉप वाल्यांना परवानगी आणि इतर वस्तूंचा व्यापार बंद हा कोणता न्याय, असा सवाल छेडा यांनी केला असून लॉकडाऊनमुळे रूग्णसंख्या कमी होईल का याचा महापालिकेने विचार करायला हवा, असे मतही त्यांनी व्यक्त केले. दुकानाचे भाडे, नोकरांचे पगार, लाईट बिल इत्यादी खर्चाने व्यापारी कोलमडले आहेत. अनेक दुकाने बंद पडतील अशा परिस्थितीत महापालिकेने व्यापार्यांविषयी सहानुभूतीने निर्णय घेऊन दुकाने पुन्हा सुरू करण्यास परवानगी द्यावी. तसेच गेल्या शंभर दिवसांपासून दुकाने बंद असल्याने महापालिकेने व्यावसायिक मालमत्ता कर रद्द करावा अशी मागणीही रसिक छेडा यांनी केली आहे.