वेबिनारच्या माध्यमातून नगरसेवकांशी संवाद
महापालिकेचा उपक्रम : कोवीड-19 उपाययोजनांची होणार चर्चा
ठाणे
कोवीड-19 च्या अनुषंगाने महापालिकेच्यावतीने करण्यात येणा-या उपाययोजनांच्या पार्श्वभूमीवर प्रशासन आणि नगरसेवक यांच्यामध्ये समन्वय ठेवण्याच्यादृष्टीने आता वेबिनारच्या माध्यमातून नगरसेवकांशी संवाद साधण्यात येणार आहे.
काही दिवसांपूर्वी प्रभागनिहाय दक्षता समिती स्थापन करण्याबाबत महापौर नरेश गणपत म्हस्के, उपमहापौर, सर्व नगरसेवक आणि महापालिका आयुक्त यांनी वेबिनारच्या माध्यमातून संवाद साधला होता. या चर्चेमध्ये प्रभाग समितीनिहाय अथवा परिमंडळनिहाय वेबिनारच्या माध्यमातून अशी चर्चा व्हावी असा प्रस्ताव पुढे आला त्यानुसार महापालिका आयुक्त डॉ. विपिन शर्मा यांनी हा निर्णय घेतला.
या वेबिनारच्या माध्यमातून कोवीड-19 च्या अनुषंगाने जी उपाययोजना करण्यात येत आहे. त्याविषयीची चर्चा तसेच कोरोना कोवीड-19 चा संसर्ग रोखण्यासाठी काय करण्याची गरज आहे याविषयी चर्चा होणार आहे.
हा वेबिनार 15 जुलै पासून सुरु होणार असून 15 जुलै रोजी परिमंडळ-1 (कळवा), उपआयुक्त मुंब्रा व दिवा प्रभाग समिती, 16 जुलै रोजी परिमंडळ-2 (वागळे-नौपाडा-कोपरी), तर दिनांक 17 जुलै रोजी परिमंडळ-3 मधील (उथळसर, माजिवडा-मानपाडा, वर्तकनगर आणि लोकमान्यनगर-सावरकरनगर) समित्यांची बैठक दुपारी 1 ते 3 या वेळेत होणार आहेत.
या बैठकीमध्ये महापौर, उपमहापौर, स्थायी समिती सभापती, सभागृह नेते आणि विरोधी पक्षनेत्या यांच्याबरोबरच संबंधित प्रभाग समितीचे सर्व नगरसेवक, परिमंडळ उप आयुक्त, सहाय्यक आयुक्त, कार्यकारी अभियंता आणि संबंधित प्रभाग समितीमधील आरोग्य केंद्रांचे वैद्यकिय अधिकारी सहभागी होणार आहेत.