मीरा भाईंदर मध्ये ३६६ बेडचे 'कोविड हेल्थ सेंटर' पुढील आठवड्यात सुरु होणार
शिवसेना आमदार प्रताप सरनाईक यांच्या सातत्यपूर्ण पाठपुराव्याला यश
कोरोना पेशंटना मिळणार मोफत उपचार
पेशंटना मोफत इंजेक्शन देण्याची सरनाईक यांची मागणी पालकमंत्र्यांकडून मान्य
भाईंदर
मीरा भाईंदर मधील कोरोना पेशंटना राज्य सरकारकडून मोफत उपचार मिळावे म्हणून 'कोविड केअर सेंटर' व हॉस्पिटल व्हावे म्हणून मे महिन्यापासून सतत आग्रही राहिलेल्या शिवसेना आमदार प्रताप सरनाईक यांच्या प्रयत्नांना व सातत्यपूर्ण पाठपुराव्याला अखेर यश आले आहे. भाईंदरच्या 'स्व. प्रमोद महाजन सभागृह' व 'स्व. सौ. मीनाताई ठाकरे मंडई इमारत' येथे एकूण ३६६ बेड , आवश्यक सुसज्ज सुविधांसह 'समर्पित कोविड आरोग्य केंद्रा'ची उभारणी करण्यात आली आहे. यात ऑक्सीजन बेडसह अतिदक्षता विभागही तयार करण्यात आला आहे. आज शिवसेना आमदार प्रताप सरनाईक यांनी या कामाची पाहणी करून पुढील आठवड्यात ही दोन्ही सेंटर सुरु होतील व मीरा भाईंदर मधील कोरोना पेशंटना येथे मोफत उपचार मिळतील , असे त्यांनी सांगितले.
मीरा भाईंदर शहरात कोरोना रुग्णांची संख्या वाढू लागल्यानंतर शहरात हे कोविड सेंटर तसेच मोठे हॉस्पिटल तयार करण्यासाठी आमदार प्रताप सरनाईक यांनी प्रयत्न चालवले होते. राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याशी २५ मे रोजी चर्चा केल्यानंतर उद्धव ठाकरे यांनी मीरा भाईंदर शहरासाठी तात्काळ हे कोविड सेंटर मंजूर केले होते. त्यांनी राज्याच्या मुख्य सचिवांना पुढील कार्यवाही करण्याच्या सूचना दिल्या होत्या. तसेच त्यासाठी १५ कोटी रक्कम मंजूर करण्यात आली होती. आ. प्रताप सरनाईक यांनी राज्याचे मुख्य सचिव अजोय मेहता , अतिरिक्त मुख्य सचिव सीताराम कुंटे तसेच म्हाडाचे अधिकारी राधाकृष्णन यांच्याकडे पाठपुरावा करून , मीरा भाईंदर पालिकेचे तत्कालीन आयुक्त चंद्रकांत डांगे यांच्याशी सतत संपर्क ठेऊन या कोविड सेंटरसाठी जागा निश्चित केल्या व मीरा भाईंदर मध्ये कोविड सेंटरचे काम सुरु करून घेतले. म्हाडाच्या माध्यमातून हे कोविड सेंटर उभारले गेले आहे.
भाईंदर पूर्वेला स्व. प्रमोद महाजन सभागृह येथे २०६ बेड , तसेच स्व. सौ. मीनाताई ठाकरे मंडई इमारत याठिकाणी १६० बेडच्या आवश्यक सुविधांसह 'समर्पित कोविड आरोग्य केंद्रा'ची (डेडिकेटेड कोविड हेल्थ सेंटर) उभारणी केली गेली आहे. याठिकाणी ऑक्सिजन बेड तयार करण्यात आले असून गरज लागली तर कोरोना पेशंटला तेथे ऑक्सिजनही दिला जाणार आहे. अतिदक्षता विभाग (आयसीयू) मध्ये ४ आयसीयू बेडही याठिकाणी असणार आहेत. म्हणजे एखाद्या रुग्णाला व्हेंटिलेटर लागला तर तीही सोय येथे आहे. या कोविड सेंटरचे काम जवळपास पूर्ण झाले असून पुढील आठवड्यात मीरा भाईंदर मधील कोरोना पेशंटवर येथे उपचार सुरु होणार आहेत. या कोविड सेंटरसाठी लागणारा आवश्यक कर्मचारी वर्ग नियुक्त करण्यात आला आहे. येथे येणाऱ्या सर्वसामान्य पेशंटना मोफत उपचार मिळणार असून पालिकेच्या माध्यमातूनच चहा , नाश्ता , जेवण दिले जाईल , असे सरनाईक यांनी सांगितले. या दोन्ही कोविड सेंटरचे प्रमुख डॉ. बच्छाव यांच्यासह आमदार प्रताप सरनाईक यांनी कोविड सेंटरच्या कामाची पाहणी करून आवश्यक त्या सूचना आरोग्य विभागाला केल्या. सध्या या दोन्ही कोवीड सेंटर मध्ये ३६६ बेड उपलब्ध झाले असून गरज पडल्यास आणखी ५० बेड वाढवू शकतो , तसे नियोजन करून ठेवले आहे , असे डॉ. बच्छाव यांनी सांगितले.
महागडी इंजेक्शन मोफत मिळणार !* - सरनाईक
खासगी हॉस्पिटल कोरोना पेशंटना जादा बिले देत असून त्यांची लूट करीत आहेत. आता भाईंदर मधील ही कोविड सेंटर सुरु होणार असून येथे सर्व औषधोपचार मोफत होणार आहेत. कोरोना पेशंटसाठी आवश्यक असणाऱ्या इंजेक्शनचा काळाबाजार तसेच प्रचंड किमतीत हि इंजेक्शन बाहेर विकली जातात. त्यामुळे या दोन्ही कोविड हेल्थ सेंटर मध्ये ज्यांना गरज लागेल त्यांना Ramdesivir (रेमडेसिवीर इंजेक्शन) व Actemra (अक्टेमेरा 400 मिलीग्राम इंजेक्शन) ही इंजेक्शन पालिकेने मोफत द्यावीत , अशा सूचना सरनाईक यांनी केल्या आहेत. सरनाईक यांची मागणी पालकमंत्री एकनाथ शिंदे यांनी मान्य केली आहे. या इंजेक्शनची ऑर्डर पालिका आयुक्त विजय राठोड यांनी सिप्ला कंपनीला दिली असून गरजेप्रमाणे इंजेक्शन पेशंटना मोफत दिली जाणार आहेत.
अक्टेमेरा हे एक इंजेक्शन साधारण ३१ हजार ६०० रुपयांना मिळते तर रेमडेसिवीर ६ इंजेक्शन कोरोना पेशंटला गरज लागली तर द्यावी लागतात , त्या एका इंजेक्शनची किंमत ५ हजार ४०० इतकी आहे. ही इंजेक्शन जर कोणत्या कोरोना रुग्णाला लागली तर पालिकेच्या या दोन्ही कोवीड सेंटर मध्ये इंजेक्शन मोफत मिळणार आहेत , असे प्रताप सरनाईक यांनी सांगितले आहे. राज्य सरकारकडून आणखी निधी आपण पालिकेला उपलब्ध करून देऊ पण गरजू पेशंटला पालिकेच्या माध्यमातूनच ही इंजेक्शन मोफत मिळाली पाहिजेत , असे सरनाईक यांनी सांगितले.
खासगी हॉस्पिटलना चाप
मीरा भाईंदर मध्ये आतापर्यंत पालिकेच्या सुविधा पुरेशा नसल्याने कोरोना रुग्णांना खासगी हॉस्पिटल मध्ये जावे लागत होते. आता ३६६ बेडची कोवीड सेंटर म्हणजेच हॉस्पिटल सुरु होत असल्याने नागरिकांना येथे मोफत उपचार मिळतील. त्यामुळे कोरोना रुग्णांना खासगी हॉस्पिटल मध्ये जावे लागणार नाही. मुख्यमंत्र्यांनी साधारण १५ कोटी इतका निधी मीरा भाईंदरसाठी कोविड उपाय योजनांसाठी दिला होता. त्यातील १० कोटी मीरा भाईंदर महापालिकेला देण्यात आले. तर साधारण ५ कोटी पर्यंतच्या खर्चातून दोन कोवीड हेल्थ सेंटर म्हाडाच्या माध्यमातून तयार करण्यात आली आहेत , अशी माहिती आमदार प्रताप सरनाईक यांनी आज दिली.