कोरोनाच्या औषधाबाबत महापौरांचे आयुक्तांना पत्र

 कोरोनाचा संसर्ग झालेल्या सामान्य व मध्यमवर्गीय ठाणेकरांसाठी औषधाचा साठा ठाणे महापालिकेने खरेदी करण्यासाठी आयुक्तांना पत्र


ठाणे


ठाणे शहरातील कोरोना बाधित रुग्णांच्या संख्येत वाढ होत असून ही वाढ विशेषत झोपडपट्टी व चाळींमध्ये राहणाऱ्या नागरिकांमध्ये होत आहे. कोरोनाच्या उपचारासाठी प्रभावी औषध म्हणून सध्या रेमडेसिवीर, टॉसिलिझुमब इंजेक्शन आणि फेविपिरावीर गोळ्यांचा प्रभावी वापर होत आहे. या इंजेक्शनसाठी किमान १२ हजार ५०० रुपयांपासून ४० हजारांपर्यत खर्च येत आहे. फेविपिरावीर ही गोळी महागडी आहे. अनेक रुग्णांना ४० हजार रुपयांची दोन इंजेक्शने देण्याची शिफारस डॉक्टरांकडून केली जात आहे. तसेच या औषधांचा सकारात्मक परिणाम रुग्णांवर दिसून येत आहे. मात्र ही औषधे उपलब्ध होत नसल्यामुळे रुग्णांना इतरत्र जावे लागत आहे. ही औषधे उपलब्ध करुन देण्यासंदर्भात सिप्ला कंपनीशी पत्रव्यवहार केलेला आहे. उपरोक्त नमूद औषधे ठाणे महानगरपालिकेच्या माध्यमातून रुग्णांना उपलब्ध झाली तर त्यांना इतरत्र कोठेही जावे लागणार नाही. तसेच कोरोनाबाधित रुग्णांचे बरे होण्याचे प्रमाण देखील वाढण्यास मदत होईल.  शासनाकडे पाठपुरावा करुन ही औषधे ठाणे महानगरपालिकेस उपलब्ध होतील या दृष्टीने तातडीने कार्यवाही करावी. असे ठामपा आयुक्तांना पत्राद्वारे ठाणे महापालिकेचे महापौर नरेश म्हस्के यांनी पत्राद्वारे कळवले आहे.