शहरातील धोकादायक व अनधिकृत होर्डिंग्ज तात्काळ हटवावेत
महापालिका आयुक्त डॉ.विपीन शर्मा यांचे आदेश
ठाणे
ठाणे शहरात ठिकठिकाणी उभारण्यात आलेल्या होर्डिंग्जची पाहणी करुन धोकादायक स्थितीत असलेले जाहिरात फलक तात्काळ निष्काषित करावेत तसेच व अनधिकृतपणे उभारण्यात आलेल्या जाहिरात फलकांवर त्वरीत कारवाई करावी असे आदेश महापालिका आयुक्त डॉ. विपीन शर्मा यांनी जाहिरात विभागाला दिले आहेत. काल नवीमुंबई क्षेत्रात कल्याण शीळ मार्गावरील दिशादर्शक फलक कोसळल्याची घटना घडण्याच्या पार्श्वभूमीवर महापालिका आयुक्तांनी हे आदेशदिले आहेत. ठाणे शहरात अशा घटना घडून कोणतीही जीवितहानी होवू नये यासाठी शहरातील सर्व होर्डिंग्ज व दिशादर्शक फलकांची पाहणी करुन जे जाहिरातफलक धोकादायक स्थितीत आहेत ते जाहिरातफलक निष्कासित करण्याच्या सूचना महापालिका आयुक्तांनी दिल्या आहेत. पावसाळ्यात वादळी वा-यामुळे मोठे जाहिरात फलक कोसळण्याची शक्यता आहे. ठाणे शहरातही पूर्वद्रुतगती मार्ग तसेच शहरातील विविध ठिकाणी जाहिरात फलकांची पाहणी करावी तसेच त्यांचे स्ट्रक्चरल ऑडिट करुन घेण्याचे आदेशही महापालिका आयुक्तांनी दिले आहे. त्याचप्रमाणे शहरातील अनधिकृत जाहिरात फलकही तात्काळ हटविण्याच्या सूचनाही महापालिका आयुक्तांनी जाहिरात विभागाला दिल्या आहेत.