महात्मा फुले जन आरोग्य योजना कोरोना लाभार्थी रुग्णांची संख्या जाहीर करा

महात्मा फुले जन आरोग्य योजना कोरोना लाभार्थी रुग्णांची संख्या जाहीर करा


ठाणे


महात्मा फुले जन आरोग्य योजनेतून विनामूल्य उपचार झालेल्या कोरोना रुग्णांची संख्या जाहीर करावी अशी मागणी नगरसेवक मनोहर डुंबरे यांनी योजनेच्या मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांकडे केली आहे. या योजनेतून हॉस्पीटलमध्ये दाखल झालेल्या अनेक लाभार्थी रुग्णांकडून हॉस्पीटलने जादा पैसे आकारल्याच्याही घटना घडल्या असल्याकडे डुंबरे यांनी लक्ष वेधले आहे. महात्मा फुले जन आरोग्य योजनेतून कोरोनाच्या रुग्णांवर विनामूल्य उपचार करण्याची घोषणा राज्य सरकारकडून करण्यात आली होती. त्यामुळे राज्यातील ११ कोटींहून अधिक जनतेला मोठ्या अपेक्षा निर्माण झाल्या होत्या.


मात्र सद्यस्थितीत या योजनेचा तळागाळातील आणि सामान्य परिस्थितीतील रुग्णांना फायदा होत नसल्याचे निदर्शनास आले आहे. या योजनेतून सध्या केवळ गंभीर स्थितीतील रुग्णांवरच मोफत उपचार केले जातात. काही वेळा या रुग्णांनाच काही रक्कम रुग्णालयात भरण्यास सांगण्यात येत आहे तर काही रुग्णालयांमध्ये रुग्णांना दाखलच केले जात नाही त्यामुळे या योजनेच्या अंमलबजावणीत त्रृटी असल्याबरोबरच रुग्णालय प्रशासन मुजोर असल्याचे उघड होत आहे. गेल्या तीन महिन्यांच्या काळात कोरोनाचा संसर्ग झालेल्या शहरातील किती रुग्णांवर मोफत उपचार करण्यात आले. किती रुग्णांना हॉस्पीटलला जादा रक्कम अदा करावी लागली, याची सविस्तर माहिती जाहीर करावी अशी मागणी डुंबरे यांनी मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. सुधाकर शिंदे यांच्याकडे केली आहे.