खासगी डॅा.क्टरांच्या सेवा अधिग्रहित करणार : महापालिका आयुक्तांचा निर्णय

खासगी डॅा.क्टरांच्या सेवा अधिग्रहित करणार : महापालिका आयुक्तांचा निर्णय
सहाय्यक आयुक्तांना अधिकार प्रदान


ठाणे


कोरोना कोवीड १९ चा वाढता संसर्ग लक्षात घेवून आणि भविष्यात क्वारंटाईन सेंटरमध्ये लागणारी डॅाक्टरांची आवश्यकता लक्षात घेवून महापालिका आयुक्त डॅा. विपिन शर्मा यांनी कोरोना विषाणूच्या संसर्गाच्या अनुषंगाने महाराष्ट्र वैद्यकिय परिषद, मुंबईच्या अंतर्गत येणा-या खासगी डॅाक्टरांच्या सेवा अधिग्रहित करण्याचा महत्वाचा निर्णय घेतला आहे.


सद्यस्थितीत कोरोना कोवीड १९ चा प्रादूर्भाव मोठ्या प्रमाणात वाढत असून प्रभाग समिती स्तरावर महापालिकेच्यावतीने क्वारंटाईन सेंटर्स निर्माण करण्यात आले आहेत. त्याचप्रमाणे भविष्यातही अशा प्रकारची सुविधा निर्माण करण्यात येणार आहे. यासाठी मोठ्या प्रमाणात डॅाक्टारांची आवश्यकता भासणार आहे. त्यामुळे या सेवा अधिग्रहित करण्याची गरज लक्षात घेवून हा निर्णय घेण्यात आला आहे.


महापालिका आयुक्तांनी खासगी डॅाक्टरांच्या सेवा अधिग्रहित करण्याचे अधिकार प्रभाग समितीच्या सहाय्यक आयुक्तांना प्रदान केले असून याबाबतचे नमुने सर्व सहाय्यक आयुक्तांना देण्यात आले आहेत. संबंधित प्रभाग समित्यांच्या सहाय्यक आयुक्तांनी त्यांच्या आवश्यकतेनुसार खासगी डॅाक्टरांची सेवा अधिग्रहित करून त्याची यादी महापालिका मुख्यालयास सादर करण्याचे आदेश महापालिका आयुक्त डॅा. विपिन शर्मा यांनी दिले आहेत.