सिग्नल शाळेचे बारावीतही यश.... युवराज पवार बारावी पास



सिग्नल शाळेचे बारावीतही यश.... युवराज पवार बारावी पास



ठाणे


अठरा विश्‍व दारिद्रय आणि विस्‍थापित आयुष्‍यांचा कलंक पुसण्‍यासाठी सरसावलेल्‍या सिग्‍नल शाळेच्‍या विद्यार्थ्‍याने आणखी एक परीक्षा उत्‍तीर्ण केली. शाळेचा दशरथ युवराज पवार विद्यार्थी बारावीच्या परीक्षेत 55 टक्के गुण मिळवत उत्तीर्ण झाला. सिग्नल शाळेच्या हा विद्यार्थी दोन वर्षांपूर्वी दहावीची परीक्षा उत्तीर्ण झाला होता. यानंतर त्याने आयुष्‍याची आणखी एक लढाई जिंकली.


समर्थ भारत व्‍यासपीठ आणि ठाणे महानगरपालिका यांच्‍या संयुक्‍त विद्यमाने सिग्‍नल शाळा हा अभिनव उपक्रम सुरू करण्यात आला. तीन हात नाक्‍यापुलाखाली राहत असलेल्‍या आणि महाराष्‍ट्रातील दुष्‍काळी भागातील स्‍थलांतरीतांच्‍या मुलांसाठी या उपक्रमाची सुरुवात पाच वर्षांपूर्वी करण्यात आली. दोन वर्षांपूर्वी या शाळेतील दोन विद्यार्थी दहावी उत्तीर्ण झाले. यानंतर बारावीचा निकाल गुरुवारी जाहीर झाला. त्‍यात शाळेचा दशरथ युवराज पवार हा विद्यार्थी 55 टक्‍के गुण मिळवत उत्तीर्ण झाला. तर शाळेचा आणखी एक विद्यार्थी मोहन काळे हा सध्‍या डिप्‍लोमा इन इलेक्ट्रिकल इंजिनिअरिंग करत आहे.


महापौर नरेश म्‍हस्‍के, ठाणे मनपातील शिक्षण मंडळाचे सभापती विकास रेपाळे, शिक्षण विभागाचे उपायुक्‍त मनिष जोशी यांनी सातत्‍याने दिलेल्‍या प्रोत्‍साहनामुळे दशरथला या विद्यार्थ्याला हे यश मिळवता आले.


...आणि म्हणून मला 'पोलीस' व्हायचंय -


दहावीची परिक्षा उत्तीर्ण झालेल्‍या दशरथला पोलीस दलात सहभागी व्‍हायचे आहे. यासाठी त्याने ज्ञानसाधना महाविद्यालयात कला शाखेत प्रवेश घेतला. अकरावी आणि बारावीत असतानापासून तो दादोजी कोंडदेव स्‍टेडियम येथील भोसले पोलीस अकादमीत प्रशिक्षण घेत आहे. शाळा सुरू असताना रोज सकाळी ६ ते १२ वाजेपर्यंत असे 6 तासांची शारीरिक कसरत आणि यानंतर पुन्हा ज्ञानसाधना महाविद्यालयात 1 ते 6 वाजेपर्यंत कॉलेज करायचा. बारावीची परिक्षा उत्तीर्ण झाल्‍यानंतर आता त्‍याला पोलीस दलात भरती व्हायचे आहे. पारधी समाजाची गुन्‍हेगारी समाज म्‍हणून त्‍याची हेटाळणी केली जाते. या समाजातील मुलेही उच्‍चशिक्षण घेऊ शकतात आणि कायदा सुव्‍यवस्‍था राखण्‍यासाठी आपले योगदान देऊ शकतात, हा संदेश मला पोलीस होऊन द्यायचा आहे, असे दशरथचे स्वप्न आहे.


तर दशरथला सिग्‍नल शाळेच्‍या शिक्षिका आरती परब, प्रियांका पाटील, सुमन शेवाळे, ज्ञानसाधना महाविद्यालयातील प्राचार्य चंद्रशेखर मराठे, प्राध्‍यापिका भारती जोशी, सुप्रिया कर्णीक, अश्विनी ओंधे, चारूलता देशमुख, सुनिता जमने, सीमा केतकर यांचे सहकार्य मिळाले.