पालकंमंत्र्यांनी पीपीई किट घालून केली कोरोना बाधित रूग्णांची विचारपूस
ठाणे
पालकमंत्री एकनाथ शिंदे यांनी काल ११ जुलै रोजी अचानक ठाणे कोव्हीड हॉस्पीटलला भेट दिली. कल्याणची बैठक आटोपून शिंदे ठाण्याला परत निघत होते. अचानक त्यांनी गाडी कोवीड रूग्णालयाकडे घेण्यास सांगितले. तेथे पोहोचल्यानंतर तेथील सुविधांची पाहणी केली आणि पीपीई किट घालून डॉक्टरांसोबत चक्क कोरोना बाधित रूग्णांच्या वॉर्डसना भेटी दिल्या.या भेटीत त्यांनी रूग्णांना गरम पाणी मिळते का तसेच शौचालये आणि बाथरूम साफ आहेत का याचीही पाहणी केली. पीपीई किट घालून कोरोना बाधित रूग्णांची विचारपूस करून तेथे काम करणा-या डॉक्टरांचे आणि इतर कर्मचा-यांचे मनोधैर्य उंचावले. यावेळी त्यांनी काळजी घ्या आणि लवकर बरे व्हा अशा शुभेच्छा दिल्या.
यावेळी कोवीड रूग्णालयातील सर्व रूग्णांना त्यांच्या वतीने दूध, अंडी आणि फळे देण्याचा निर्णय घेतला. डायलेसीस, आयसीयू,ॲाक्सीजन आणि नॉन ॲाक्सीजन वार्डसना भेटी देऊन जेवण व्यवस्थित मिळते का, औषधे दिली जातात का, काही अडचण आहे का अशी विचारपूस केली. घाबरू नका, काळजी घ्या आणि लवकर बरे व्हा असे म्हणत त्यांनी तेथील रूग्णांचे मनोबल वाढविले. त्याचबरोबर डॉक्टर्स, नर्सेस, पॅरामेडिकल स्टाफ यांच्याशीही संवाद साधून स्वत:ची काळजी घेण्याच्या सूचना केल्या.