ठाणे जिल्हा परिषदेचा १२४ कोटी ५९ लाख ५२ हजार ६०० रुपयांचा मूळ अर्थसंकल्प सादर
ठाणे
ठाणे जिल्हा परिषदेचा सन २०१९ -२० चा सुधारित आणि सन २०२०-२१ चा १२४ कोटी ५९ लाख ५२ हजार ६०० रुपयांचा मूळ अर्थसंकल्प आज झालेल्या जिल्हा परिषद सर्वसाधारण सभेत सभापती सुभाष पवार यांनी सादर करण्यात आला. सन २०२०-२१ च्या मूळ अर्थसंकल्पात जिल्हा परिषदेच्या निरनिराळ्या विभागांकडील सामूहिक व वैयक्तिक लाभाच्या कल्याणकारी योजना प्रामुख्याने घेण्याचा प्रयत्न करण्यात आल्याचे पवार यांनी सांगितले.
कोरोनाच्या प्रादुर्भावामुळे आज झालेली सर्वसाधारण सभा हि ऑनलाईन पद्धतीने घेण्यात आली होती. त्यामुळे जिल्हा परिषदेचे सन्मानीय सभापती, जिल्हा परिषद सदस्य, विविध विभागाचे विभाग प्रमुख सर्वसाधारण सभेस ऑनलाईन पद्धतीने सहभागी झाले होते. यंदा कोरोनाच्या प्रादुर्भावामुळे दरवर्षी होणारी अर्थसंकल्पीय सभा घेणे शक्य नसल्याने शासनाने जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी यांना जिल्हा परिषदेच्या मूळ अंदाजपत्रकास मान्यता देऊन पुढील जिल्हा परिषद सर्वसाधारण सभेत सदर अहवाल सादर करण्याचे सूचित केले होते. त्यानुसार २७ मार्च २०२० रोजी शासन आदेशानुसार मुख्य कार्यकारी अधिकारी हिरालाल सोनवणे यांनी सन २०१९ -२० चा सुधारित आणि सन २०२०-२१ च्या मूळ अंदाजपत्रकास मान्यता दिली होती. त्यामुळे आज झालेल्या सर्वसाधारण सभेत २०१९ -२० चा सुधारित आणि सन २०२०-२१ चा मूळ अर्थसंकल्प सादर करण्यात आला. कोव्हीड संदर्भात शासनाने निर्गमित केलेल्या आदेशाची काटेकोर अमलबजावणी करत ही सर्वसाधारण घेण्यात आली.मुख्य लेखा व वित्त अधिकारी गीता नागर, सभेचे पदसिद्ध सचिव तथा उप मुख्य कार्यकारी अधिकारी (प्रशासन) छायादेवी शिसोदे उपस्थित होत्या.
या अर्थसंकल्पात सामान्य प्रशासन, शिक्षण, बांधकाम, पाटबंधारे, आरोग्य विभाग, ग्रामीण पाणी पुरवठा, कृषि, पशुसंवर्धन, समाजकल्याण, महिला व बाल विकास, ग्रामपंचायत, अपंग कल्याण आदी विभागांना विविध योजनासाठी निधीची तरतूद करण्यात आलेली आहे. शिवाय नवीन पाणीपुरवठा योजनांसाठी शासनाकडून मोठ्या प्रमाणात निधी उपलब्ध होतो. तथापि, देखभाल दुरुस्तीसाठी अत्यल्प प्रमाणात निधी उपलब्ध होतो, हे विचारात घेऊन देखभाल दुरुस्तीसाठी जिल्हा परिषद अर्थसंकल्पात स्वतंत्ररित्या भरीव तरतूद करण्यात आली आहे. जेणेकरून पाणीपुरवठ्याच्या नादुरुस्त किंवा बंद योजना सुरू करून ग्रामीण भागात सुरळीत पाणीपुरवठा उपलब्ध होईल.