मिरारोडच्या शबरी बार अँड रेस्टॉरंटमध्ये घडले दुहेरी हत्याकांड
मीरारोड -
बारमधील दोघा कर्मचाऱ्यांची हत्या करण्यात आल्याची घटना नुकतीच मीरारोड येथे उघडकीस आली आहे. त्यांचे मृतदेह बारमधील पाण्याच्या टाकीत टाकण्यात आले होते. मीरारोडच्या शीतल नगरमध्ये एमटीएनएल मार्गावर शबरी बार अँड रेस्टॉरंटमध्ये हे दुहेरी हत्याकांड घडले आहे. सदर बारच्या मालकाने याची माहिती गुरुवारी रात्री साडे दहाच्या सुमारास मीरारोड पोलिसांना दिली.
पोलीस निरीक्षक संदीप कदम सह पोलीस पथकाने घटना स्थळी धाव घेतली असता टाकीत दोघांचे मृतदेह आढळून आले. नरेश पंडित (52) व हरेश शेट्टी (48) अशी हत्या झालेल्यांची नावे आहेत. दोघेही बारचे कर्मचारी होते. दुहेरी हत्याकांडाची माहिती मिळताच ठाणे ग्रामीण पोलीस अधीक्षक डॉ शिवाजी राठोड, अपर पोलीस अधीक्षक संजय पाटील, उपअधीक्षक शांताराम वळवी यांनी घटनास्थळी भेट देऊन माहिती घेतली व तपासाबाबत मार्गदर्शन केले. दोन्ही मृतांच्या डोके व शरीरावर जखमा आढळल्या असून गुन्हा दाखल केला आहे. यात संशयितचा तपास सुरू असल्याचे संदीप कदम म्हणाले.