तब्बल २१ दिवसांनतर प्रियांशीची आई-वडीलांशी भेट




शिवसेनेने पालकत्व घेतलेल्या चिमुकल्या प्रियांशीला तिच्या वाढदिवसाच्या पूर्वसंध्येला तिच्या आईवडिलांकडे केले सुपुर्द....
 

ठाणे -

 

ठाणे येथे राहत असलेल्या पुजारी कुटुंबातील सर्वजण करोनाबाधित झाल्याचे निदर्शनास आले असतानाच त्यांची अकरा महिन्याची कन्या प्रियांशी मात्र सुदैवाने करोना निगेटिव्ह असल्याचे निष्पन्न झाले होते. आई, वडील, आजी, आजोबा अशा सर्वांनाच रुग्णालयात दाखल व्हावे लागल्यामुळे त्यांच्या समोर प्रियांशीची काळजी कोण घेणार, अशी चिंता होती. मात्र, ठाणे जिल्ह्याचे पालकमंत्री एकनाथ शिंदे यांना ही बाब कळताच शिवसेना ठाणे जिल्ह्याच्या वतीने त्यांनी प्रियांशीची जबाबदारी घेण्याचा निर्णय घेतला. त्यानुसार शिवसैनिक बाळा मुदलियार यांची पत्नी व महिला आघाडीच्या कार्यकर्त्या सौ. रीनाताई मुदलियार यांनी पुढाकार घेऊन हा संपूर्ण काळ प्रियांशी सोबत राहाण्याची तयारी दर्शवली आणि त्यांची सोय टिप टॉप प्लाझा येथे करण्यात आली. दरम्यानच्या काळात प्रियांशीचे आईवडील करोनाचा यशस्वी सामना करून पूर्णत: बरे झाले आणि तब्बल २१ दिवसांच्या कालखंडानंतर आज, गुरुवारी प्रियांशीला त्यांच्या सुपूर्द करण्यात आले. उद्या, शुक्रवारी प्रियांशीचा वाढदिवस आहे, याचे औचित्य साधून ठाणे शिवसेनेच्या वतीने तिचा वाढदिवसा साजरा करण्यात आला. स्वत: एकनाथ शिंदे आवर्जून या हृद्य सोहळ्यात सहभागी झाले आणि त्यांनी प्रियांशीला भावी आयुष्याकरिता आशीर्वाद दिले. याप्रसंगी प्रियांशीच्या आईवडिलांनी शिवसेनेचे आभार व्यक्त केले.