संभाव्य निसर्ग चक्रीवादळाच्या पार्श्वभूमीवर ठाणे महानगरपालिकेची यंत्रणा सतर्क

संभाव्य निसर्ग चक्रीवादळाच्या पार्श्वभूमीवर ठाणे महानगरपालिकेची यंत्रणा सतर्क
ठाणेकरानी खबरदारी बाळगण्याचे महापौर, महापालिका आयुक्तांचे आवाहन



ठाणे


महाराष्ट्राच्या पश्चिम किनारपट्टीवर दिनांक ३ जून २०२० रोजी निसर्ग चक्रीवादळ धडकण्याची शक्यता हवामान खात्याने वर्तवली आहे. या पार्श्वभूमीवर ठाणे महानगरपालिका क्षेत्रातील सर्व यंत्रणांना सतर्क राहण्याच्या सूचना देण्यात आल्या असून ठाणेकर नागरिकांनी आवश्यक ती खबरदारी बाळगावी असे आवाहन महापौर नरेश गणपत म्हस्के आणि महानगरपालिका आयुक्त विजय सिंघल याेनी केले आहे.
     अरबी समुद्रात कमी दाबाचा पट्टा तयार होत असून त्याचे रूपांतर चक्रीवादळामध्ये होण्याची शक्यता आहे. हे चक्रीवादळ ३ जून २०२० रोजी पश्चिम किनारपट्टी भागावर धडकण्याची शक्यता हवामान खात्याने वर्तवली आहे. या कालावधीमध्ये वेगवान वारे वाहण्याची शक्यता असून जोरदार पाऊस कोसळण्याची शक्यताही वर्तविण्यात आली आहे.  ही परिस्थिती लक्षात घेवून ठाणे महानगरपालिकेचा प्रादेशीक आपत्ती व्यवस्थापन कक्ष आणि विभागवार प्रभाग समिती नियंत्रण कक्ष पुरेशा मनुष्यबळासह सज्ज ठेवण्यात आले आहेत. ठाणे अग्निशमन दल यांच्यासह राज्य आपत्ती निवारण दल( SDRF) व ठाणे आपत्ती प्रतिसाद दला (TDRF)चे पथक सुसज्ज ठेवण्यात आली आहेत. त्याचबरोबर केंद्र व राज्य शासनाच्या आदेशाप्रमाणे आवश्यक ती कार्यवाही महानगरपालिका प्रशासनाकडून तातडीने हाती घेण्यात आली आहे.
 दरम्यान, सर्व सहाय्यक आयुक्तांनी आपापल्या प्रभाग समितीतंर्गत संभाव्य धोका पोहोचू शकणाऱ्या वसाहती तसेच सखल भागातील वसाहती निश्चित करून तेथील नागरिकांना जवळपासच्या शाळांमध्ये अथवा सुरक्षित ठिकाणी स्थलांतरित करण्याचे निर्देश महापालिका आयुक्तांनी दिले आहेत. मच्छीमार व इतरांनी देखील खाडीकिनारपट्टीवर  जाऊ नये, खाडी किनाऱ्यापासून लांब रहावे, झाड आणि खांब यांच्याखाली नागरिकांनी उभे राहू नये, वादळाच्या कालावधीमध्ये घराबाहेर पडू नये अशे आवाहन करण्यात आले आहे.


ठाणे शहरातील मोठ्या औद्योगिक आस्थापना आणि पेट्रोकेमिकल कंपन्यांनी आपली यंत्रणा व सामुग्री सुरक्षित ठेवण्यासाठी योग्य त्या उपाययोजना तातडीने कराव्यात. ठाण्यातील सर्व रुग्णालयांनी वीज जनित्र (जनरेटर) कार्यान्वित आहेत, याची दक्षता घेऊन वीजपुरवठा अखंड सुरू राहील, याची तजवीज करावी, असे निर्देशही देण्यात आले आहेत. नागरिकांनी अफवांवर विश्वास ठेवू नये, आवश्यक साधने जवळ बाळगावीत आणि वैयक्तिक स्तरावर देखील खबरदारी घ्यावी, असे आवाहन महानगरपालिका प्रशासनाच्यावतीने करण्यात येत आहे.