चेंबरमध्ये पडून सुरक्षारक्षकाचा मृत्यू

चेंबरमध्ये पडून सुरक्षारक्षकाचा मृत्यू


भिवंडी :


येथील येवई (पांजरापोळ) येथील जलशुद्धीकरण केंद्राच्या पाइपलाइनवरील उघड्या चेंबरमध्ये पडून गस्तीवरील सुरक्षारक्षक शिवराम बुधाजी भोईर (५७, रा. मोहाचा पाडा, पुंडास) यांचा शनिवारी रात्री मृत्यू झाला. पुंडास ग्रुपग्रामपंचायतीच्या उपसरपंच शर्मिला भोईर यांचे शिवराम हे पती होते. ते गेल्या ३५ वर्षांहून अधिक काळ मुंबई महापालिकेच्या पाणीपुरवठा विभागात सुरक्षारक्षक म्हणून कार्यरत होते.


शनिवारी रात्रपाळीला आल्यानंतर ते आपले कर्तव्य बजावत होते. पांजरापोळ येथून जवळच्या टेकडीवर असलेल्या पाण्याच्या पाइपलाइनची पाहणी करण्यासाठी ते गस्त घालत असताना अंधारात पाय घसरून ते पाच फूट खोल असलेल्या उघड्या चेंबरमध्ये पडले. त्यांच्या डोक्याला जबर मार लागून त्यांचा जागीच मृत्यू झाला.


रविवारी दुपारी त्यांचे सहकारी सुरक्षारक्षक सचिन महाजन व संजय कारभल हे कामावर आले असता त्यांना भोईर यांची दुचाकी पाण्याच्या टाकीजवळ दिसली. भोईर यांचा शोध घेतला असता ते उघड्या चेंबरमध्ये मृतावस्थेत आढळले. या घटनेची माहिती पोलिसांना मिळताच पोलीस उपनिरीक्षक श्रेयन राठोड यांनी पथकासह घटनास्थळी धाव घेतली. तालुका पोलीस ठाण्यात आकस्मिक मृत्यू म्हणून नोंद करण्यात आली आहे. भोईर यांच्या अपघाती मृत्यूची नोंद केली असली तरी यामागे घातपात तर नाही ना? याचीही चौकशी पोलीस करीत आहेत.